www.24taas.com, झी मिडिया, औरंगाबाद
औरंगाबादच्या अंधारी गावात हल्ली लोक एकट्या-दुकट्यानं अजिबात फिरत नाहीत... आयाबाया आपल्या कच्चा-बच्चांना पदराआड लपवून ठेवतात... लहान मुलं शाळेत जायलाही तयार नाहीत... कारण इथं दहशत पसरलीय माकडांची. या माकडांच्या टोळीनं आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गावकऱ्यांना चावे घेतलेत. माकडांच्या हैदोसाने गावकरी पुरते त्रासले आहेत.
अगदी संचारबंदी लागल्यासारखी अंधारी गावात शांतता पसरलेली दिसते. एरव्ही गावात घराबाहेर बसलेली लोकं दिसतात. पण, या गावात कुणीही घराबाहेर बसत नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून या गावाला माकडांनी पिसाळलंय. गावात एकटा दुकटा माणूस दिसला की ही माकडं त्याच्यावर थेट हल्लाच करतात. लहान मुलं तर माकडांची सहज शिकार बनली आहेत. गेल्या सात दिवसांत या माकडांनी २० पेक्षा जास्त लोकांना चावा घेतलाय. एकटी बाई किंवा माणूस दिसला की ही माकडं त्याचा लचकाच तोडतात...
गीता नावाच्या गृहिणीच्या घरात तर बंद दरवाजाला लाथ मारून माकड घुसलं आणि त्यांच्या लहानग्या मुलाला त्यांच्या मांडीवरून उचलून त्याचे लचके तोडले. तर मारूतीरायाचं रूप समजल्या जाणाऱ्या या माकडांनी सकाळी देवदर्शनाला गेलेल्या कारभारी डोंगरेंवर मारूती मंदिरातच हल्ला केला. आठ दिवसांआधीच वन विभागाने हैदोस घालणाऱ्या एका माकडाला जेरबंद केलंय. पण माकडांचा उच्छाद सुरूच आहे. गावात असं एकही घर उरलं नाही की ज्या घरात माकडांनी कधी कुणाला चावा घेतला नसेल. माकडांच्या भीतीनं मुलं आता शाळेत जायला सुद्धा घाबरतात.
माकडांना पकडायला वन विभागाचे लोक गावात फिरत आहेत. पण माकडांची संख्या इतकी की त्यांचीही दमछाक होतेय. लोकांच्या जखमा पाहिल्यावर माकडांचा हैदोस किती भयानक आहे, याची कल्पना येते. माकडांच्या या मर्कटलीलांपासून कुणीतरी आमची सुटका करा, असं गाऱ्हाणं घालण्याची पाळी अंधारीच्या गावकऱ्यांवर आलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.