www.24taas.com, झी मीडिया, नांदेड
नांदेड पुन्हा एकदा चर्चेत आलंय. काँग्रेसने काल आपली तिसरी यादी जाहीर केली. मात्र अजूनही नांदेडचा उमेदवार जाहीर केलेला नाही. इथून अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. मात्र अजून ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.
नांदेड हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. याठिकाणचे विद्यमान खासदारही काँग्रेस पक्षाचेच. तरीही इथला उमेदवार जाहीर झालेला नाही. या ठिकाणाहून खुद्द अशोक चव्हाण किंवा त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे खतगावकर हे अशोक चव्हाणांचे मेव्हणे आहेत. मात्र खतगावकरांच्या विजयाची खात्री खुद्द अशोकरावांनाच नसल्याने उमेदवारी कापली जाण्याची शक्यता आहे. मात्र अशोकराव यावर स्पष्ट काही बोलायला तयार नाहीत.
मागच्या निवडणुकीत अशोक चव्हाण मुख्यमंत्री असतानाही इथे भाजपच्या संभाजी पवारांना पावणे तीन लाख इतकी प्रचंड मतं पडली होती. यावेळी तर मोदींची लाट असल्यामुळे काँग्रेसची ही जागा पडली तर राज्यभर नाचक्की होईल तसंच पक्षश्रेष्ठींसमोर आपलं वजन कमी होईल अशी भिती अशोक चव्हाणांना आहे. त्यामुळे स्वतःच मैदानात उतरण्याची तयारी अशोक चव्हाणांनी केल्याचं समजतंय. पक्षश्रेष्ठींनी चव्हाणांना उमेदवारी दिली नाही तर पत्नी अमिता चव्हाण यांना तरी उमेदवारी मिळावी अशी त्यांची खटपट सुरू आहे.
अशोकराव आता मुख्यमंत्री नाहीत. आदर्श प्रकरणातही ते अडकले आहेत. त्यामुळे यावेळी या परिस्थितीचा फायदा घेत नांदेड काहीही करून सर करायचा चंग भाजपने बांधलाय. मात्र गेल्यावेळी पावणेतीन लाख मतं घेणारे संभाजी पवार गंभीर आजारी आहेत. त्यामुळे भाजपने आपले राष्ट्रवादीत गेलेले माजी खासदार डी. बी. पाटील यांना पुन्हा भाजपत घेऊन उमेदवारी जाहीरही केलीय. तर भाजपप्रमाणेच एमआयएमनेही नांदेडसाठी शक्ती पणाला लावलीय. इथल्या मुस्लिम मतांवर डोळा ठेऊन त्यांनी ही रणनिती आखलीय.
पत्ता कापला गेल्याची चर्चा असली तरी भास्करराव खतगावकर अजूनही आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी दिल्लीत तळ ठोकून आहेत. अशोकराव खतगावकरांच्या विजयाबाबत साशंक आहेत. नांदेडच्या याच पेचामुळे इथली उमेदवारी लटकल्याची चर्चा आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.