लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

Updated: Jan 5, 2013, 07:50 PM IST

www.24taas.com, शशिकांत पाटील, लातूर
लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे. दरम्यान पाण्यावरून तालुक्यातील राजकारण चांगलचं पेटलंय.
उन्हाळ्याला अजून दोन ते तीन महिने अवकाश असतानाच लातूर जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीये. लातूर आणि औसा शहरात पिण्याच्या पाण्याची भयानक स्थिती आहे. लातूर शहराला आठवड्यातून दोन वेळाच पाणी पुरवठा केला जातोय. तर औसा शहराला पंधरा दिवसांतून एकदा पाणी मिळतयं. जिल्ह्यातील इतर गावांत पाण्याचं दुर्भिक्ष आहे. टँकरमधून एक हंडा पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतोय.

औसा शहरात प्रचंड पाणीटंचाई असताना तब्बल दीड कोटी रुपयांच्या सिमेंटच्या रस्ते बांधणीतून पाण्याचा अपव्यय करण्याचा घाट नागरपालिकेनं घातलाय. त्या कामांच समर्थनही मुख्याधिकाऱ्यांनी केलंय. लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होऊ लागलीये. पाण्याची तीव्र टंचाई असताना सरकारी यंत्रणांकडून पाणी वापराचं नियोजन केलं जात नाही. ही स्थिती अशीच राहिल्यास लातूर जिल्ह्यात पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहणार नाही अशी भीती व्यक्त केली जाते आहे.