विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
ऐन दुष्काळात नगरसेविकांनी केरळच्या टूरचा घाट घातलेला असताना औरंगाबाद महापालिकेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शहरातल्या जलवाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी चक्क शिवरायांचे वस्तू संग्रहालय गहाण टाकण्याची वेळ आली आहे. शहरातल्या इतरही २४ मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
औरंगाबाद महापालिकेला सध्या झालय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवारीच महापालिकेच्या महिलानगरसेवकांची केरळ टूरटूरची बातमी पुढे आली आणि आता जलवाहिनीच्या प्रकल्पासाठी महापालिका संपत्ती गहान ठेवणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मुख्य म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास जपणारे शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय सुद्धा आता महापालिका गहाण ठेवणार आहे.
औरंगाबाद महापालिका सध्या एकाहून एक धक्कादायक निर्णय़ घेत आहे. शहर भीषण पाणीटंचाईच्या झळा सोसत असताना नगरसेविकांची केरळ टूरटूर ची जय्यत तयारी सुरु आहे. महापालिकेच्या तिजोरीत खडखडात असतानाही या टूरचे आयोजन करण्यात येतेय आणि आता दुसरीकडे समांतर जलवाहिनी प्रकल्पासाठी पैसै नसल्याचे कारण देत महापालिकेनं आयडीबीआय़ बँकेकडे आपल्या ताब्यातील 25 मालमत्ता गहाण ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेला 100 कोटी रुपयांची गरज आहे, तर विजेचे थकीत बिल भऱण्यासाठी 100 कोटींची गरज आहे, त्याचा पहिला हप्ता 100 कोटी महापालिकेला मिळाले आहे मात्र समांतर जलवाहिनीसाठी गरज असलेल्या 100 कोटीच्या हप्त्यासाठी बँकेने काहीतरी गहाण ठेवण्याची मागणी केली आणि त्यासाठी महापालिकेनं शहरातील अब्जावधी किमतीच्या स्वमालकीच्या प्राईम लोकेशनच्या तब्बल 25 मालमत्ता गहान ठेवण्याची तयारी सुरु केली आहे. यात धक्कादायक रित्या, शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय, पंडीत जवाहरलाल नेहरू बालोद्यान, आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या इमारतीही गहाण ठेवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय, पंडीत जवाहरलाल नेहरू बालोद्यान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राची इमारत, मनपा मुख्य इमारत, शहागंज आठवडी बाजाराची जागा, महापालिकेची वाचनालय, हॉस्पिटल्स, मनपाच्या शॉपिंग कॉम्पलेक्सच्या इमारती, यासह 25मालमत्ता महापालिका आयडीबीआय बँकेकडे गहाण ठेवणार आहे.
महत्वाचं म्हणजे 19 जानेवारीच्या सभेत प्रशासनाने मालमत्ता गहाण ठेवण्याच्या प्रस्तावास गुपचूप मंजूरी मिळवली आणि महापौरांनी गुपचूपपणे त्या ठरावावर स्वाक्षरी केल्याचीही माहिती पुढे आली आहे. या गहाण मुद्द्यावरून गोंधळ झाल्यानंतर आता मात्र पदाधिकारी थेट अधिका-यांकडे बोट दाखवून स्वतःला वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तर भाजप नगरसेवकही प्रशासनच्या या प्रस्तावावर नाराज आहेत थेट महापालिका गहाण ठेवणे दुर्देवी बाब असल्याचं ते मान्य करताय.. मात्र स्वताही ते सत्तेत भागिदार असल्याचे सोयिस्करपणे विसरता आहेत. गहाण मुद्द्याने विरोधकांना आयते कोलीतच मिळाले आहे राष्ट्रवादीने यावर राजकारण करीत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शिवाजी महाराजांच्या नावावर मत मिळणा-या या शिवसेना भाजपने महाराजांनाच गहाण ठेवण्याचा विक्रम केल्याची टीका ते करत आहेत.
महापालिका कंगाल असल्याने पैसै मिळण्यासाठी महापालिका आता काहीही करायला तयार झाली आहे असे चित्र निर्माण झाले आहे, खुद्द महाराजांचा इतिहास आणि महापालिकेची मुख्य इमारतच गहान ठेवण्याच्या या निर्णय़ानंतर आता महापालिकेला म्हणावे तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे कदाचित भविष्यात महापालिका विकणे आहे असा फलक जरी लावण्यात आला तर त्यात वावगे काय असा प्रश्न नागरिकांना पडल्यावाचून राहणार नाही..