अबू आझमींचं राज ठाकरेंना आव्हान

जालना येथे समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण करताना अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी युपी-बिहापी असल्याचा आरोप करणारे राज ठाकरे औरंगाबादमधील गँगरेप घटनेबाबत का मौन बाळगून गप्प आहेत? असा सवाल अबू आझमींनी केला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 28, 2013, 04:50 PM IST

www.24taas.com, जालना
जालना येथे समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण करताना अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी युपी-बिहापी असल्याचा आरोप करणारे राज ठाकरे औरंगाबादमधील गँगरेप घटनेबाबत का मौन बाळगून गप्प आहेत? असा सवाल अबू आझमींनी केला. अशी वक्तव्यं उत्तर प्रदेश- बिहार येथे येऊन करून दाखवा, असं आव्हानही अबू आझमींनी राज ठाकरेंना दिलं आहे.
अबू आझमी यांच्या भाषणादरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे समाजवादी पार्टी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमधील संभाव्य ‘राडा’ रोखला गेला. यामुळे वातावरण काही काळ तंग होतं, मात्र अबू आझमी यांनी या प्रकारावरही भाष्य करत, ‘हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार’ असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला. तुम्ही आपलं कार्य करत राहा असं अबू आझमी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले.
हिंदू दहशतवादाबद्द्लही अबू आझमींनी सरकारला धारेवर धरलं. जर हिंदू दहशतवादाचे पक्के पुरावे तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही कारवाई का करत नाहीत? असा सवाल अबू आजमींनी सुशीलकुमार शिंदेंना केला. सिमी संघटनेविरोधात पुरावेही नसताना त्यावर बंदी घातली जाते, त्यामुळे पुरावे असूनही सनातन संस्था, अभिनव भारत यांसारख्या संघटनांवर कारवाई का होत नाही? असा प्रश्न आझमींनी विचारला. या संघटनांवर लवकरात लवकर बंदी घालण्याची मागणी आझमींनी केली आहे.