www.24taas.com, मुंबई
दिल्लीमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना आणि सचिन तेंडुलकरची निवृत्ती या दोन घटना गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही चटका लावून गेल्यात. २०१२ हे वर्ष वाईट घटनांचं होतं, असं व्यथित लतादीदींनी म्हटलंय.
बलात्कारातील आरोपींवर कडक करवाई करावी अशी मागणी गामसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलीय. तसंच वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटनांनी व्यथित होऊन लतादीदींनी ही प्रतिक्रिया दिलीय.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला नको होती असं मत ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केलं. त्यांचं सचिनवर असणारं प्रेम सगळ्यांनाच माहीत आहे. एरव्ही शांत दिसणाऱ्या लतादीदी सचिनचा विषय निघाल्यावर मात्र मोठ्या आपुलकीनं आणि उत्साहात बोलताना दिसतात. मात्र, आज सचिनचा विषय निघाल्यावर त्या दु:खी झाल्या. सचिननं वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घ्यायला नको होता, असं त्यांनी म्हटलंय.
सचिनवर जेव्हा इतर लोक निवृत्तीसाठी दबाव टाकत होते त्याहीवेळेस लतादिदिंनी सचिनची पाठिराखण करत, त्यानं निवृत्ती का घ्यावी? असा सवाल केला होता. ‘आपण आपल्या सर्वोत्कृष्ट कलाकार आणि खेळाडूंबाबतीत असं का वागवतो, आपण त्यांच्यावर कामगिरीसाठी एवढं दडपण का आणतो?’असा संतप्त सवालदेखील त्यांनी विचारला होता.