www.24taas.com, मुंबई
माननीय मुख्यमंत्र्यांना सरकार वाचविण्यासाठी चिंता वाटत आहे. सिंचन घोटाळ्यात पूर्णपणे निर्दोष ठरत नाही तोपर्यंत मी मंत्रिमंडळात येणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले होते. या घोटाळ्यावर चर्चा झाली नाही, कुठलाही निष्कर्ष आला नाही. पण कुठेतरी राष्ट्रवादीच्या दबावापुढे मुख्यमंत्री झुकले आणि पुन्हा अजित पवार यांचे पुनरागमन होत आहे, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
सिंचन घोटाळ्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर श्वेतपत्रिका सादर झाल्यानंतर अजित पवार यांचा कमबॅक होणार असे झी २४ तासने वृत्त दिले होते. त्यानुसार उद्या अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
जो पर्यंत या घोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत पवारांच्या या निर्णयाचे स्वागत करणे योग्य नाही. या निर्णयाचा धिक्कार करतो, असे खडसे यांनी सांगितले.
आगामी अधिवेशनात हा मुद्दा आम्ही विशेष करून मांडणार आहोत. राष्ट्रवादीने जे घोटाळे केले त्याची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.