www.24taas.com, वृषाली देशपांडे, मुंबई
सचिन तेंडुलकर टीम इंडियाचा मिस्टर रेकॉर्डब्रेकर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तर त्यानं सेंच्युरीची सेंच्युरीही पूर्ण केली. क्रिकेटमध्ये अगणित रेकॉर्ड करणारा सचिननं 40 व्या वर्षात आज पदार्पण केलं आहे.
सचिन रमेश तेंडुलकर भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. क्रिकेटच्या या आराध्य दैवतानं नेहमीच त्याच्यासाठी त्याच्या चाहत्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण केली. सचिन मैदानावर उतरला की, नेहमीच त्याच्याकडून फोर, सिक्स आणि सेंच्युरीची आशा त्याचे चाहते करतात. आणि चाहत्यांच्या या अपेक्षा मास्टर-ब्लास्टरनं नेहमीच पूर्ण केल्यात.
त्यानं प्रस्थापित केलेल्या माईलस्टॉन्सना पार करणं तर शक्यच नाही शिवाय त्याच्या रेकॉर्ड्सच्या जवळपासही कोणीही पोहचू शकत नाही. क्रिकेटच्या या मिस्टर रेकॉर्डब्रेककरच्या अभूतपूर्व कामगिरीला अवघ्या क्रिकेटविश्वानं सलाम ठोकला आहे. रेकॉर्डसच्या या बेताज बादशाहनं सेंच्युरीच्या सेंच्युरीला गवसणी घातल्यानंतर त्याला भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणीही जोर धरु लागली आहे.
इतिहासात पहिल्यांदाच क्रीडा विभागासाठी विशेष तरतूद सरकानं केली आणि त्याचा भारतरत्न मिळवण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
15 नोव्हेंबर 1989 मध्ये त्यानं क्रिकेटच्या मैदानावर एंट्री घेतली. अवघ्या 16 व्या वर्षी क्रिकेटची सुरुवात करणा-या सचिनचं क्रिकेटवरील निस्सिम प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. क्रिकेटवरील प्रेमामुळेच त्याला क्रिकेटमधील यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करता आली आहेत.
2011 च्या वर्ल्ड कप विजयातही सचिनचा वाटा मोलाचा होता. 24 वर्षांनी टीम इंडियानं वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला. वर्ल्ड कप विजयी टीमचा सदस्य बनण्यासाठी त्यालाही तब्बल 23 वर्ष वाट पाहायला लागली होती. क्रिकेटच्या मैदानावर सचिन जसा सुपहिट आहे. तसाच मैदानाबाहेरही तो हिट ठरलाय.
सामाजिक कार्यातही तो नेहमीच पुढे असतो. त्याचप्रमाणे एक मुलगा, पती आणि पिता म्हणूनही त्यानं आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. अशा या क्रिकेटच्या दैवताला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !