माही वि. वीरू, युद्ध आमुचे सुरू

Updated: Jan 10, 2012, 07:27 PM IST

www.24taas.com, पर्थ

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभव सहन करावा लागला. या पराभवाची कारणं अनेक आहेत. मात्र याचदरम्यान, कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये सध्या कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे यामुळे सिनियर आणि ज्युनियर क्रिकेटपटूंमध्ये दुफळी निर्माण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये टीम इंडिया मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील कामगिरीसाठीच चर्चेत आहे. मैदानाबाहेरील चर्चेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली ती  टीम इंडियानं प्रॅक्टिसला दांडी मारत गो-कार्टिंगला प्राधान्य दिलं तेव्हा. गो-कार्टिंगला धोनीसह टीमचे काही प्लेअर्स  गेले होते. मात्र धडाकेबाज ओपनर सेहवाग आणि काही प्लेअर्सला सरावाला प्राधान्य देण्याचं मत होतं. त्यामुळेच धोनी आणि सेहवागमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

ऑस्ट्रेलियाच्या हेराल्ड सन या वृत्तपत्रानं तर कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात मतभेद असल्याच स्पष्ट म्हटलं आहे. टीम इंडियामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एक सेहवागचा तर एक धोनीचा. एक गट असा आहे की जो धोनीऐवजी वीरेंद्र सेहवागनं कॅप्टन्सी करावी या मताचा आहे. त्यामुळेच क्रिकेटपटूंमध्ये ही दरी निर्माण झाली असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे टीम मीटिंगमध्ये युवा क्रिकेटपटूंना आपली मत बेधडकपणे मांडताही येत नाहीत. हा सगळा प्रकार ग्रेग चॅपेल यांनी भारताचे कोच असतांना निदर्शनास आणला होता.

 

मात्र, या सगळ्या प्रकारानंतर टीम इंडिया ‘बॅक ऑन ट्रॅक’ आली होती. इंग्लंडमध्ये तोंडघाशी पडल्यानंतर ऑस्ट्रेलियात टीम इंडियाची तिच गत झाली आहे. पराभवामुळेच सिनियर्स आणि ज्युनियर्समध्ये गटबाजी सुरु झाली आहे. या चर्चा थांबवायच्या असल्यास भारताला विनिंग ट्रॅकवर परतावं लागणार आहे.

 

 

Tags: