हॉकीत भारतीय महिलांची बाजी

भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.

Updated: Jan 19, 2012, 12:06 PM IST

 www.24taas.comनवी दिल्ली 


भारत - अझरबैझान महिला हॉकी सामन्यात भारतीय महिला टीमने सलग तिसरा विजय मिळवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली.

 

भारतीय महिलांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन करून अझरबैझानचा ३-० असा सहज पराभव केला. या विजयाने भारताने चार सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. पहिले दोन सामने जिंकल्यामुळे भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी तिसरा सामना बरोबरीत सोडविणेसुद्धा चालणार होते.

 

मेजर ध्यानचंद मैदानावर झालेल्या या सामन्यात भारतीय महिलांना अझरबैझानच्या अचूक नियोजनाचा प्रतिकार करावा लागला. मात्र, संयमाने खेळ करताना मिळालेल्या संधीचा अचूक फायदा उठवत भारतीय महिलांनी विजय मिळविला. सुशीला चानू हिने तिसऱ्याच मिनिटाला खाते उघडल्यावर पूर्वार्धातच ३२व्या मिनिटाला अनुराधा देवीने दुसरा गोल केला. त्यानंतर उत्तरार्धात सामन्याच्या ६७ व्या मिनिटाला रितू राणीने भारताचे विजयाधिक्‍य वाढविणारा गोल केला.

 

मध्यंतराला तीन मिनिटे शिल्लक असतानाच रितूच्याच पासवर अनुराधाने दुसरा गोल केला. उत्तरार्धात रितूने चेंडू खेळविण्याचे सुरेख कौशल्य दाखवत मध्य रेषेपासून चेंडूवर नियंत्रण ठेवत अझरबैझानचे गोलपोस्ट गाठले. त्याच लयीत तिने सुरेख फटका मारून जाळीचा अचूक वेध घेतला. सलग तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले.