स्पेनच ठरलं 'युरोपिअन किंग'

इटलीचा 4-0 नं धुवा उडवत स्पॅनिश टीम सलग दुस-यांदा युरोपियन चॅम्पियन झाली. या विजयासह त्यांनी तिसऱ्यांदा युरो कप जिंकण्याची किमया साधली. फुटबॉलच्या इतिहासात तीन मेजर टायटल जिंकत स्पॅनिश टीमनं नवा इतिहास रचला आहे.

Updated: Jul 2, 2012, 10:32 AM IST

www.24taas.com, मुंबई

 

इटलीचा 4-0 नं धुवा उडवत स्पॅनिश टीम सलग दुस-यांदा युरोपियन चॅम्पियन झाली. या विजयासह त्यांनी तिसऱ्यांदा युरो कप जिंकण्याची किमया साधली. फुटबॉलच्या इतिहासात तीन मेजर टायटल जिंकत स्पॅनिश टीमनं नवा इतिहास रचला आहे. ईकेर कॅसियसच्या टीमनं फायनलमध्ये सहज बाजी मारत आपलं टायटल डिफेंड करण्यात यश मिळवलं आहे.

 

इटलीला पराभूत करत स्पॅनिश टीमनं युरो कपचं टायटलं यशस्वीरित्या डिफेंड केलं. स्टार पावरचा भरणा असलेल्या या टीमनं तब्बल चार गोल झळकावत इटालियन टीमला पराभवाची चव चाखायला लावली. ईकेर कॅसियसच्या टीमनं या विजयासह युरो कपच्या इतिहासास पहिल्यांदाच युरो कपचं टायटल डिफेंड करण्याचा रेकॉर्ड केला. त्याचप्रमाणे तिनदा युरो कप पटकावत जर्मनीच्या तीन वेळा विजेतेपद पटकावण्याच्या रेकॉर्डशी त्यांनी बरोबरीही केली. तत्पूर्वी,  मॅचच्या सुरुवातीपासूनच त्यांनी मॅचवर आपली पकड मजबूत केली. 10 व्या मिनिटालाच झावीनं गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र गोलपोस्टच्या बारला बॉल लागला आणि स्पॅनिश जायंट्सच्या पहिल्या प्रयत्नला यश आलं नाही. त्यानंतर 14 व्या मिनिटाला आंद्रेस इनियस्तानं सेक फाब्रेगासकडे पास दिला आणि फाब्रेगासच्या क्रॉस पासवर डेव्हिड सिल्व्हानं हेडरवर गोल करत स्पेनला 1-0 नं आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही टीम्सनी गोल करण्याचे प्रयत्नव केले. आणि पुन्हा एकदा स्पॅनिश टीमलाच गोल करण्यात यश आलं. 41 व्या मिनिटाला जॉर्डी आल्बानं टुर्नामेंटमधील आणि आपल्या देशासाठी पहिला आंतरराष्ट्रीय गोल झळकावत स्पॅनिश टीमची आघाडी आणखी वाढवली.

 

पहिल्या हाफमध्येच स्पेननं 2-0 नं आघाडी घेतली होती. आणि तिथेच कॅसियस अँड कंपनीनं अर्धी लढाई जिंकली होती. सेकंड हाफमध्ये दोन्ही टीम्सनं अटँकींग फुटबॉल खेळलं. मात्र, स्पॅनिश टीम इटालियन टीमपेक्षा सरस ठरली. आणि सबस्टिट्यूट म्हणून आलेल्या फर्नांडो टोरेस आणि ज्युआन माटानं गोल करत स्पेनच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यानंतर स्टेडियमवर सुरु झाला तो स्पॅनिश टीमचा विजयी जल्लोष.. आणि त्यांच्या विजयोत्सवात संपुर्ण स्टेडियम सहभागी झालं. ईकेर कॅसियनं सलग दुस-यां युरो कपची ट्रॉफी उचलली. त्याच्या टीमनं सर्वोत्तम खेळ करत आपणच युरोपचे किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं.