www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्राचा आनंद सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या वारीला सुरूवात झालेली आहे. तर दुसरीकडं फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये आजपासून सुरू होणार आहे. विठू नामाचा गजर करत निवृत्ती नाथांच्या पालखीनं पंढरपूरकडं प्रस्थान ठेवलं आहे. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान रविवारी १० जूनला देहू येथून होतं आहे.
तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान ११ तारखेला आळंदीहून होतं आहे. दोन्ही ठिकाणच्या पालखी संस्थांनी जय्यत तयारी केली असून पालखी प्रस्थानासाठी देहू आणि आळंदी गाव सज्ज झाली आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्यांनी यापूर्वीच पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. येत्या ३० तारखेला आषाढी एकादशीनिमित्त सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात येतील. त्याचबरोबर लाखो वारकरीही या आनंदवारीत सामील होणार आहेत.
तर दुसरीकडे लंडन ऑलिम्पिकपूर्वी सर्वांना वेध लागले आहेत, ते युरो कप २०१२ टूर्नामेंटचे. फूटबॉल वर्ल्ड कपनंतर महत्त्वाची अशी युरो कप टूर्नामेंट पोलंड आणि युक्रेनमध्ये आजपासून सुरू होणार आहे. ८ जून ते १ जुलैपर्यंत रंगणाऱ्या युरो कप टूर्नामेंटमध्ये एकूण १६ युरोपियन टीम्स चॅम्पियनशीपकरता एकमेकांसमोर उभ्या ठाकणार आहेत. पोलंड आणि ग्रीस यांच्यातल्या सलामीच्या मॅचनं युरो कपला सुरूवात होणार आहे. एकीकडे वारीचा आनंद सोहळा तर दुसरीकडे युरो कपमधला उत्साह अशी आनंद पर्वणी पुढचे काही दिवस मिळणार आहे.
[jwplayer mediaid="116726"]