राज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

Updated: Mar 2, 2012, 08:16 AM IST

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही.  त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

मीरारोड मध्ये मुजोर रिक्षा चालकांनी सलग दुस-या दिवशीही बंद पाळला. आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतुकीचं नवं दरपत्रक जारी केलंय. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्याचं सांगत, कोणतीही पूर्वसूचना न देता रिक्षाचालकांनी दोन दिवस बंद पाळला. यामुळं नागरिकांचे हाल झाले. सीएनजीचे दर ३ रुपयांनी वाढल्यामुळं आरटीओनं दिलेलं दरपत्रक मान्य नसल्याची भूमिका रिक्षाचालकांनी घेतली आहे.  तसेच नवी मुंबईत रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात. तर काही ठिकाणी मीटरप्रणाणे पैसे न घेता जादा पैसे घेतले जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असतानाच इलेक्टॉनिक मीटर सक्तीविरोधात नागपुरातल्या रिक्षा चालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला. सरकारनं इलेक्ट्रॉनिक मीटरची सक्ती केली, या कारणास्तव ऑटोचालक संघटनेने हा संप पुकारला. संपाच्या या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र ऑटो चालकांच्या या संपामुळे दहावीची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांना फटका बसलाय. संपामुळे परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. शिवाय इतर शाळकरी विद्यार्थ्यांनाही शाळेत वेळेवर पोहचण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

दरम्यान, एकिकडे रिक्षा चालकांची मुजोरी तर दुसरीकडे  रिक्षा भाडेवाढीसाठी शरद राव आक्रमक झाले आहेत. भाडेवाढ न दिल्यास १६ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा शरद राव यांनी दिलाय. किमान १६ ते २०रुपये भाडेवाढीची मागणी शरद राव यांनी केली आहे. मीटर सक्ती नको, मात्र भाडेवाढ हवी, अशी आडमुठी भूमिका आता संघटना घेऊ लागल्या आहेत. याचवेळी मंत्रालयात होणारी बैठक रद्द झाल्याने रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा आज होणारा निर्णय लांबणीवर पडलाय.