अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या अनुकूल हवामानामुळे पश्चिम किनारपट्टीवर वरुणराजा चांगलाच प्रसन्न झालेला दिसतोय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलीय. आज दिवसभर कोकणात आणि विदर्भात आणि गोव्यात काय दैना उडवलीय पावसानं... टाकूयात एक नजर...
सिंदुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण, वेंगुर्ला, कणकवली, देवगडमध्ये पाऊस सुरु आहे. त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालीय, तर महामार्हावरील वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. मालवण तालुक्यातील कालावाल खाडी, कुडाळ, कणकवलीतील नद्यांना पूर आलाय. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानं, शेतजमिनीत पाणीच पाणी झालंय. रविवारपासून हीच परिस्थिती आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसानं कहर केलाय. राजापूर शहरात निर्माण झालेली पूरस्थिती आज दुसऱ्या दिवशी तशीच आहे. शहरात पाच फूट पाणी साचलंय तर गणतीपुळे भागातही पूरस्थिती आहे. गणपतीपुळेत 3 फूट पाणी साचलंय. दुसरीकडे संगमेश्वर तालुक्यातल्या कोळंबे गावात डोंगर आणि शेतजमिनीला भेगा पडल्यात. यामुळे काही घरांना धोका निर्माण झालाय.
विदर्भ-खान्देश
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर विदर्भ आणि खान्देशात जोरदार पुनरागमन केलंय. काल नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ आणि अमरावतीत रात्रभर जोरदार पाऊस झालाय तर जळगाव आणि धुळे जिल्ह्यातल्या काही तालुक्यांत चांगला पाऊस बरसलाय. पावसाच्या पुनरागमनामुळं काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट टळलंय. त्यामुळं बळीराजाला दिलासा मिळालाय.
गोव्यात कालपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून वाहतूक विस्कळीत झालीय. गेल्या 24 तासात 142 मिमी पावसाची नोंद झाली असून येत्या 24 तासातही आणखी मुसळधार पावसाचा अंदाज गोवा वेधशाळेनं व्यक्त केलाय. आतापर्यंत गोव्यात 1372 मिमी पाऊस पडला असून हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त आहे. समुद्रात जोराचे वारे वाहत असल्याने मासेमारीसाठी जाऊ नये, असा इशाराही ‘कॅप्टन ऑफ पोर्ट’ने दिलाय.