कास पठाराचं नवं रुपडं...

कास पठार म्हणजे सातारा जिल्ह्याची एक ओळखचं... याच वैशिष्ट्यपूर्ण कास पठारावरील फुलांचं संवर्धन करण्यासाठी वनविभागानं पाऊल उचललंय.

Updated: May 27, 2012, 07:58 PM IST

 www.24taas.com, श्रीनिवास डोंगरे, सातारा  

 

कास पठार म्हणजे सातारा जिल्ह्याची एक ओळखचं... याच वैशिष्ट्यपूर्ण कास पठारावरील फुलांचं संवर्धन करण्यासाठी वनविभागानं पाऊल उचललंय. फुलांच्या संवर्धनासोबत पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा, यासाठी स्थानिकांना गाईडचं प्रशिक्षण देण्यात येतंय. त्यामुळे आता इथं येणाऱ्या पर्यटकांच्या ज्ञानात आता आणखी भर पडणार आहे.

 

सातारा शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या कास पठाराचा लवकरच जागतिक वारशांमध्ये समावेश होणार आहे. मनाला भुरळ घालणारी रंगीबेरंगी फुलं हे या पठाराचं खास वैशिष्ट्य. कास पठारावरील एक हजार हेक्टर क्षेत्रात ८४० फुलवनस्पती आहेत. जुलैपासून दोन अडीच महिने पठारावर फुलांचा बहर असतो. इथली फुलं आणि प्राणी-पक्षी पाहण्यासाठी हजारो पर्यटक कास पठाराला भेट देतात. या फुलांची शास्त्रशुद्ध माहिती पर्यटकांना मिळावी, यासाठी स्थानिकांना गाईडचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्याची प्राथमिक कार्यशाळा साताऱ्यात घेण्यात आली.

 

गेल्या वर्षी एकाच दिवसात ४० हजार पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. फुलांचं पर्यटकांकडून होणारं नुकसान आणि वाहनांची कोंडी टाळण्यासाठी प्रशिक्षित गाईड्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. फुलांचं संवर्धन, स्थानिकांना रोजगार आणि पर्यटकांच्या ज्ञानात भर असा तिहेरी उद्देश पूर्ण होणार असल्यानं वनविभागाच्या या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतूक होतंय.