www.24taas.com, मुंबई
परदेश दौऱ्यावर जाणाऱ्या मंत्र्यांना आणि आमदारांना जिल्हाबंदी करा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. राज्यात १९७२ पेक्षाही मोठा दुष्काळ पडलेला असताना, सर्वपक्षीय २४ आमदार १ जून ते १५ जूनदरम्यान युरोप दौऱ्यावर चालले आहेत.
आमदारांचा हा अभ्य़ास दौरा असला तरी राज्यातली दुष्काळाची स्थिती पाहता, हा दौरा कशासाठी असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. एक मे ते १५ जून या दरम्यान युरोप दौऱ्यावर हे आमदार जातील यामध्ये ते लंडन, पॅरिसमध्ये जाऊन अभ्यास करणार आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळा अंतर्गत लंडन पार्लमेंटला हे आमदार भेट देणार आहेत.
दुष्काळप्रश्नी अपयशी ठरलेल्या सरकारवर ठाकरे बंधु मात्र कडाडले आहेत. दुष्काळात दौरे करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना गावबंदी करा, असे आदेश शिवसेनेचे कार्यध्यक्ष उद्धव ठाकरेंनी दिलेत तर दुष्काळात परदेश दौऱ्यांवर जाणाऱ्या मंत्र्यांना जिल्हाबंदी करा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिले आहेत.