शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत

एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.

Updated: Dec 14, 2011, 12:26 PM IST

झी २४ तास वेब टीम, पुणे

 

पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यात यापूर्वी MIDC करिता मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आलीय. यानंतर आता प्रस्तावित विमानतळासाठीही तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतजमीन संपादित केली जाणार आहे. याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलनचा इशारा दिल्यानं हा प्रश्न गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.

 

भानुदास दरेकर हे पुण्यातल्या राजगुरुनगर तालुक्यात एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ते ओळखले जातात. सकाळपासूनच शेतीच्या कामाला स्वत:ला जुंपायचं आणि हिरवं सोनं पिकवायचं. शेतीच्या उत्पन्नातून दारात नवीकोरी चार चाकी गाडी आणलीय. मात्र सध्या त्यांचं चित्त थाऱ्यावर नाहीय. कारण चाकणच्या प्रस्तावित विमानतळासाठी त्यांची सगळी शेतीजमीन संपादित केली जाणार असल्यानं ते हबकून गेलेत.

 

दरेकर यांच्याप्रमाणेच अनेक शेतकऱ्यांची हिच अवस्था झालीय. कोये, कडूस, पाईट, धामणे आणि आसपासच्या १० गावांतील जमीन विमानतळासाठी घेतली जाणार आहे. पावसाच्या पाण्यावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठं ‘भामा आसखेड’ धरणातून पाणी मिळू लागलं होतं. सुखाचे चार दिवस आले असतानाच विमानतळाचे हे भूत त्यांच्या मानगुटीवर बसलंय. याविरोधात आता शेतकरी एकवटलेत.

 

एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित करण्यामागे सरकारचा हेतू तरी काय आहे?