विद्यार्थ्यांच्या विषबाधेवरही राजकारण

महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शनिवारी माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेवरही पुण्यात राजकारण सुरु झालं आहे. शिक्षण मंडळानं ही जबाबदारी झटकत माध्यान्ह भोजनाचं कंत्राट बचत गटांना देणाऱ्या नागर वस्ती विभागावर खापर फोडलं आहे.

Updated: Apr 9, 2012, 09:58 PM IST

www.24taas.com, पुणे

 

महापालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शनिवारी माध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेवरही पुण्यात राजकारण सुरु झालं आहे. शिक्षण मंडळानं ही जबाबदारी झटकत माध्यान्ह भोजनाचं कंत्राट बचत गटांना देणाऱ्या नागर वस्ती विभागावर खापर फोडलं आहे. तर दुसरीकडं नागर वस्ती विभागानं मात्र आरोप फेटाळत शिक्षण विभागाकडं बोटं दाखवलं आहे.

 

अस्वच्छता आणि दुर्गंधीनं भरलेली नाल्याच्या कडेला असलेली जागा. अशा जागेत विद्यार्थ्यांना दिलं जाणारं माध्यान्ह भोजन तयार होतं. पुणे महापालिकेच्या गावडे शाळेतील विद्यार्थ्यांना शनिवारी माध्यान्ह भोजनातील इडली खाल्यानं विषबाधा झाली होती. विद्यार्थ्यांचे माध्यान्ह भोजन अत्यंत घाणेरड्या जागेत बनविले जाते. हे समोर आलेले फक्त एक उदाहरण आहे.

 

इतर शाळांचं माध्यान्ह भोजन तयार केल्या जाणाऱ्या ठिकाणची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं हा विषय पुढं आला आहे. परंतु महापालिकेचं शिक्षण मंडळ याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. याचे खापर त्यांनी बचत गटांना माध्यान्ह भोजनाचे काम देणाऱ्या नागर वस्ती विभागावर फोडलं आहे.

 

नागर वस्ती विभागाला मात्र हा आरोप मान्य नाही. बचत गटांना काम देताना फक्त मध्यस्थ म्हणून केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. जेवणाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्याचं काम शिक्षण मंडळाचं असल्याचा दावा या विभागानं केला आहे.

 

दोघांच्या भांडणात विद्यार्थ्यांवर जीव गमावण्याची वेळ आली आहे. परंतू मूळ समस्य़ेतून मार्ग काढण्याऐवजी जबाबादारी ढकलण्याचाच राजकारण सुरु झाल्यानं प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना जाग तरी कधी येणार. असा प्रश्न विचारण्यात येतो आहे.