बीड- साताऱ्यात 'राजेंची बाजी...

नगरपालिकांच्या निवडणुका आठवडाभरावर आल्या असताना प्रचाराचं घमासान सुरु आहे. मात्र साताऱ्यात तब्बल १७ तर बीडमध्ये ७ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यानं या गावातल्या बिनविरोध पॅटर्नची चर्चा सुरु झाली.

Updated: Dec 1, 2011, 12:27 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

नगरपालिकांच्या निवडणुका आठवडाभरावर आल्या असताना प्रचाराचं घमासान सुरु आहे. मात्र साताऱ्यात तब्बल १७ तर बीडमध्ये ७ उमेदवार बिनविरोध निवडले गेल्यानं या गावातल्या बिनविरोध पॅटर्नची चर्चा सुरु झाली. दोन्ही गावातल्या पॅटर्नच्या या दोन तऱ्हा. सातारा नगरपालिकेत उदयनराजेंची सातारा विकास आघाडी आणि शिवेंद्रराजेंची नगरविकास आघाडी यांच्यात नेहमीच काट्याची टक्कर असायची.

 

ही चुरस इतकी पराकोटीचा जायची यातून आरोप-प्रत्यारोप आणि राडा ठरलेला. यंदाचं चित्र मात्र मनोमिलनाचं आहे. राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे आणि त्यांचे चुलतभाऊ आणि राष्ट्रवादीचेच आमदार शिवेंद्रराजे यांच्यात मनोमिलन झालं. याच मनोमिलनातून ३९ पैकी १७ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. त्यामुळे एकेकाळी एकेकाजागीसाठी चुरस असणाऱ्या साताऱ्यात यावेळी निवडणुकीचं वातावरण शांतशांत आहे.

 

साताऱ्यात ही स्थिती असताना गोपीनाथ मुंडे यांच्या बीड जिल्ह्यात खुद्द बीड शहरात राष्ट्रवादीनं सात जागा बिनविरोध आणत मुंडेंसह सगळ्याच विरोधकांना धोबीपछाड दिलं. धमक्या आणि अमिष दाखवून माघार घ्यायला लावल्याचा विरोधकांचा आरोप राष्ट्रवादीनं फेटाळला. राज्यात ठिकठिकाणी निवडणुकीची चढाओढ आणि उमेदवारांना टेन्शन आलं असताना साताऱ्यात मात्र दोन्ही राजांच्या मनोमिलन पॅटर्नमधून निम्या जागा बिनविरोध आल्या. आता हाच पॅटर्न विकासाच्या मार्गावरून वेगानं गेला तर सातारकरांचे भाग्य उजळू शकेल.