फुल बाजार 'फुल्ल' भरला!

बाजारात बहुतेक सर्वच फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र फुलांना अपेक्षित मागणी दिसून आली नाही. झेंडूची आवक वाढल्यामुळे भाव उतरले. आजपासून फूल बाजारात मोठी उलाढाल होण्याची शक्‍यता आहे

Updated: Oct 2, 2011, 01:48 PM IST

[caption id="attachment_1220" align="alignleft" width="300" caption="फुल बाजार ‘फुल्ल’ भरला!"][/caption]

झी 24 तास वेब टीम, पुणे

 

पितृपंधरवड्यामुळे गेले काही दिवस मंदीत असलेला फूल बाजार नवरात्रीमुळे बहरला आहे. बाजारात बहुतेक सर्वच फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मात्र फुलांना अपेक्षित मागणी दिसून आली नाही. झेंडूची आवक वाढल्यामुळे भाव उतरले. दरम्यान, आजपासून फूल बाजारात मोठी उलाढाल होईल, अशी शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

पितृपंधरवड्यामुळे फूल बाजारात मंदी होती. मात्र मंगळवारी सकाळी सर्व प्रकारच्या फुलांची मोठी आवक वाढली. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फूल बाजारात परराज्यातूनही झेंडूसह शेवंतीची मोठी आवक झाली. मागणी कमी आणि आवक जास्त असेच चित्र येथे दिसून येत होते. झेंडूची अंदाजे 25 हजार किलो एवढी आवक झाली, तर गुलछडी 18 ते 19 हजार किलो, जरबेराची सात ते आठ हजार किलो अशी आवक राहिल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीकडून देण्यात आली.
मुंबई येथे झेंडूला अधिक भाव मिळत नसल्यामुळे परराज्यातील व्यापाऱ्यांनी पुण्याला पसंती दिली. त्यामुळेच ही आवक वाढल्याचे सांगण्यात आले. आवक वाढल्याचा फटका झेंडूला सर्वाधिक बसला. त्याचे भाव किलोमागे 10 रुपयांवर स्थिरावले. गुलछडीच्या भावामध्ये वाढ होऊन ती 80 ते 100 रुपये प्रतिकिलो अशी स्थिरावली, तर शेवंतीचे भाव प्रतिकिलोमागे 80 ते 100 रुपये असे राहिले. फुलांचे व्यापारी सागर भोसले म्हणाले, "झेंडूबरोबरच पांढऱ्या शेवंतीची परराज्यातून आणि स्थानिक परिसरातून पिवळ्या शेवंतीची आवक झाली. बदलत्या वातावरणाचा फटका शेंवतीला बसला आहे. त्यामुळे अपेक्षित आवक होत नाही. मात्र दिवाळीपर्यंत या फुलांची मोठी आवक होईल, असा अंदाज आहे. सध्या फुलांना मागणी नसली तरी आजपासून मोठ्या प्रमाणावर उलाढाल होण्याची शक्‍यता आहे.''