पुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण

दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Updated: Feb 1, 2012, 10:54 AM IST

www.24taas.com, पुणे

 

दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसांसह इतर दहा पोलिसांना  मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

 

या घटनेच्या वार्तांकनासाठी आलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना आणि छायाचित्रकारांनाही मारहाण करून त्यांच्याकडील कॅमेरेही लष्कराच्या विद्यार्थ्यांनी फोडले. मारहाणीच्या घटनेनंतर हा परिसर लष्कराने ताब्यात घेतला आहे. रात्री साडेआठच्या सुमारास सीएमईच्या विद्यार्थ्यांनी पाऊण तास अक्षरशः धुडगूस घातला. काही वेळातच लष्कराचे सशस्त्र जवान चौकात आल्याने या परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले.

 

वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे कायदेशीर पावती करावी, असे पोलिसांनी सांगितल्यावर त्या दोन विद्यार्थ्यांनी संबंधित पोलिसांना थेट मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर लष्कराच्या विद्यार्थ्यांनी दूरध्वनी करून इतर मित्रांना तातडीने बोलविले. काही मिनिटांमध्ये तेथे सुमारे चाळीस विद्यार्थी जमा झाले. या सर्वांनी संभाजी पोलीस चौकीवर थेट हल्ला चढवून तेथील पोलिसांना मारहाण करण्यास सुरवात केली.

 

जीव वाचविण्यासाठी त्यांना पोलीस चौकीच्या मागील दाराने अक्षरशः पळ काढून केळकर रस्त्यावर यावे लागले. त्यानंतरही विद्यार्थ्यांनी त्यांना पाठलाग करून मारले. काही पोलिसांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी स्थानिकांची मदत घेतली. यात महिला पोलिसांचाही समावेश होता, अशी माहिती काहींनी दिली.

 

संभाजी चौकीच्या बाहेर लष्कराने  'रेड झोन' जाहीर केला व हा सर्व परिसर लष्कराच्या ताब्यात आल्याचे सांगत सामान्य नागरिकांना तेथून चालायला बंदी केली. मकरंद रानडे, ज्ञानेश्‍वर फडतरे, राजेश बनसोडे, विश्‍वास पांढरे आणि संजय जाधव अशा तब्बल पाच पोलीस उपायुक्तांनाही न जुमानता हे विद्यार्थी आणि अधिकारी धुडगूस घालत होते, असे पोलिसांनी  सांगितले.