www.24taas.com, पुणे
पुण्यात स्फोटांत जखमी झालेला दयानंद पाटील याने परदेशी वारी केली असल्याचे माहिती समोर येत आहे. दयानंद पाटील यांने जॉर्डनला भेट दिल्याचे त्याच पासपोर्टवर नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुणे स्फोट मालिकांप्रकरणी ६ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात दयानंद याच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आली आहे.
स्फोटांची चौकशी करण्यासाठी एनआयए आणि एटीएसची टीम पुण्यात तळ ठोकून आहे. स्फोटांमध्ये वापरण्यात आलेल्या ३ सायकल पुण्यातील कसबा पेठेतून बुधवारी विकत घेतल्या होत्या, असे उघड झाले आहे. या स्फोटांमागे हिंदू दहशतवादी संघटना असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात एटीएस माहिती उद्या पत्रकार परिषदेत देणार आहे.
पुण्यातल्या स्फोटांचे गूढ कायम आहे. सूत्रधाराचे धागेदोरे मिळवण्यासाठी एटीएस कसून चौकशी करतेय. स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलनं संभ्रमित करणारा जबाब दिल्यानं त्याच्यावरही संशय बळावला आहे. एटीएस दयानंद पाटीलची कसून चौकशी करत आहे. दयानंदला अजून क्लीन चिट दिली नसल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलीय. दयानंद पाटील हा कर्नाटकचा रहिवासी आहे. गेल्या तीन वर्षांपासून तो पुण्यातील उरळी कांचन भागात वास्तव्याला आहे. दहावीपर्यंत शिकलेला द्यानंद पुण्यात टेलरिंगचा व्यवसाय करतोय. तो पुण्यात त्याची पत्नी आणि अडीच वर्षांच्या मुलीसोबत वास्तव्य करतो. पण, दयानंदच्या अशिक्षित पत्नीला मात्र दयानंद कुठे आणि काय काम करतो, हे माहित नाही.