पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे कौतुकास्पद पाऊल

नेहमीच वादात असणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आलीय. मात्र यावेळी वादग्रस्त नव्हे तर चांगल्या निर्णयामुळे पालिकेची चर्चा होत आहे.

Updated: Apr 18, 2012, 10:18 PM IST

www.24taas.com, पुणे

 

नेहमीच वादात असणारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी वादग्रस्त नव्हे तर चांगल्या निर्णयामुळे पालिकेची चर्चा होत आहे. गतीमंद व्यक्तींना सांभाळणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेला किंवा पालकाला दरमहा एक हजार रूपये देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.

 

गतीमंद मुलं असोत वा व्यक्ती..त्यांना सांभाळण्याचं मोठं आव्हान पालकांसमोर असतं. बऱ्याचदा त्यांच्यावर होत असलेल्या खर्चामुळे अनेकजण मेटाकुटीला येतात. खर्च आणि त्रासामुळे गतीमंदांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी कुणी फारशी घेताना दिसत नाही. अशातच गतीमंदांच्या पालकांना दिलासा देणारा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेनं घेतलाय. गतीमंदांचा सांभाळ करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेला किंवा पालकाला महापालिका दरमहा एक हजार रूपये देणार आहे. गतीमंद पालकांना ओझं वाटू नयेत म्हणून पालिकेनं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.

 

ISO प्रमाणपत्र मिळवणारी पिंपरी चिंचवड ही पहिली महापालिका असली तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे नेहमीच चर्चेत राहिलीय. गतीमंदांच्या पालकांसाठी महापालिकेनं घेतलेला हा निर्णय पालिकेची प्रतिमा सुधारण्याच्या दृष्टीकोनातून टाकलेलं पाऊल म्हणायला हरकत नाही.