कैलास पुरी, www.24taas.com, पुणे
पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना देहू रोड परिसर जळीतकांडानं हादरला आहे. या घटनेबाबात पोलीस माहिती देत नसल्यामुळे पोलिसांच्य़ा भूमिकेवर टीका होत आहे.
सध्या पिंपरी चिंचवडमधील नागरिक चांगलेच धास्तावले आहेत. पिंपरीत एकाच रात्रीत ११ ठिकाणी घरफोडी होत असताना त्याचवेळी देहू रोड परिसरात जळीतकांड सुरू होतं. देहू रोड परिसरातील कृष्णानगरमध्ये तब्बल ६ दुचाकी आणि १ कार जाळून टाकण्यात आली आहे. पहाटे तीनच्या सुमाराला हा प्रकार घडला आहे. या सर्व गाड्यांचे पेट्रोल पाईप तोडून त्यातलं पेट्रोल काढून ते गाड्यांवर टाकून गाड्या जाळण्यात आल्या आहेत. टायर आणि इंजिन फुटून झालेल्या आवाजामुळे या भागात भीती पसरली होती. स्थानिक तरूणांनी पाणी टाकून आग वेळीच आटोक्यात आणल्याने इतर वाहनांच नुकसान टळलं.
याप्रकरणी देहू रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पण याबाबत पोलीस काहीही बोलायला तयार नाहीत. हा प्रकार राजकीय वैमन्यासातून घडला की आणखी काही कारणांमुळे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. पण एकाच रात्रीत झालेल्या या घटनांमुळे नागरिक मात्र भयभीत झाले आहेत.