www.24taas.com, पुणे
राजकारण्यांनी अडथळा आणला नाही आणि प्रशासनानं ठरवलं तर काय होऊ शकतं, याचं चांगलं उदाहरण पुण्यात समोर आलंय. पुण्यातले फ्लेक्स काढून टाकण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी करताच एका दिवसात हजारोंच्यावर फ्लेक्स आणि होर्डींग्स उतरवण्यात आली.
अजित पवार यांनी २६ जून रोजी पोलिस आणि महापालिकेला होर्डिंग्ज काढण्याचे आदेश दिले होते.
अजित पवारांचं फर्मान सुटताच गुरुवारी पुण्यातल्या रस्त्यांवरची होर्डिंग्ज आणि फ्लेक्स उतरवले गेले. बुधवारी एका दिवसात हजारच्या वर फ्लेक्स आणि होर्डिंग काढण्यात आली. त्यामुळे पुण्यातील रस्ते आणि चौक मोकळे झाले. मात्र, हजारोंच्या संख्येने असलेल्या या फ्लेक्सकडे आजवर राजकीय दबावामुळेच कानाडोळा होत होता. असं उत्तर महापालिका अधिकारी देतायत.
अजित दादांनी पोलिसांनाही या कामात जुंपलं. अजित दादांच्या आदेशानंतर फक्त फेक्स उतरले नाहीत. तर फ्लेक्सवर शुभेच्छा देणा-या ज्यांची नावं आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हेही दाखल केलेत. एका दिवसात असे ११ गुन्हे दाखल करण्यात आलेत.
शहर विद्रूप करणा-या या फ्लेक्सची संस्कृती गेल्या काही वर्षात फोफावलीय. आता फ्लेक्स काढून पुणं आणखी सुंदर होणार आहे.