झी २४ तास वेब टीम, बारामती
ऊस दरावरुन राजकारण चांगलचं पेटलं आहे. 2350 रुपयांच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसाठी राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा पवारांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीत दाखल झाली. तोडगा निघेपर्यंत मागे न हटण्याचं त्यांनी ठरवलं. तर सरकार 1450 रुपयांचा पहिला हप्ता देण्यावर ठाम आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादात सावध भूमिका घेतली.
शेतकऱ्यांना ऊसाला वाढीव भाव हवा, मात्र कारखानदार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना दाद देत नसल्यानंच हजारो शेतकरी राजू शेट्टींच्या झेंड्याखाली संघटित झाले. जोपर्यंत उसाला 2350 रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत बारामतीतच ठिय्या आंदोलन करणार असल्याचा निर्धार शेट्टी यांनी केला. बारामतीच्या शारदा शाळेच्या पटांगणात अनिश्चित काळासाठी हे आंदोलन सुरु राहणार आहे.
दुसरीकडं शेतकरी संघटनेनंही आता ऊसदरांबाबत आक्रमक भूमिका घेतली. ऊस दराच्या संदर्भातल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर 11 नोव्हेंबरपासून राज्यात चक्काजाम करण्याचा इशारा रघुनाथ पाटलांच्या शेतकरी संघटनेनं दिला.ऊसावरुन हा वणवा पेटलेला असताना, आणि खुद्द बारामतीत त्याची झळ पोहचत असतानाही ऊसलॉबीवर वर्चस्व असलेल्या पवार काका-पुतण्यांनी साखर कारखानदारांची बाजू उचलून धरली. तर सरकारनंही राजू शेट्टींच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं. ऊसाला 1450 रुपयांचा पहिला हप्ता देण्यावर सरकार ठाम आहे. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली.