अजित पवारांनी खाल्ली पलटी

पिपंरी चिंचवडच्या उपमहापौरपदावर केलेली सुमन नेटकेंची निवड रद्द करत अजित पवारांनी राजू मिसाळ यांना संधी दिली आहे. अजित पवार यांनी अचानक पलटी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे, दादा का घाबरले?

Updated: Mar 9, 2012, 06:27 PM IST

www.24taas.com,  पुणे

 

 

पिंपरी चिंचवडच्या उपमहापौरपदावर केलेली सुमन नेटकेंची निवड रद्द करत अजित पवारांनी राजू मिसाळ यांना संधी दिली आहे. अजित पवार यांनी अचानक पलटी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहे, दादा का घाबरले?

 

 

महापौर, उपमहापौर आणि गटनेते या तिन्ही पदांवर महिलांची निवड झाल्यानं पुरूषांचा दबाव वाढला. या दबावाला बळी पडत अजित पवारानी अचानक निर्णय बदलला आणि महिला दिनानिमित्त दिलेली भेट परत घेतली. हा महिलांचा अपमान  असल्याची भावना महिला नगरसेवकांतून व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीने महिला आरक्षणाला पाठिंबा देताना महिलांना संधी देण्याची भाषा केली होती. मात्र, आधी पदे बहाल करून ती पुन्हा काढून घेतल्याने राष्ट्रवादीची अजित पवारांच्या निर्णयामुळे गोची झाली आहे. अजित पवार कोणाच्या दबावाला बळी पडले? त्यांनी हा निर्णय बदलला नसता तर राजकारणात काय परिणाम झाला असता, याचीच चर्चा आता जोर धरू लागली आहे.

 

 

दरम्यान,  पुण्याच्या महापौर तसेच उपमहापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. महापौरपद ओबोसी महिला वर्गासाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादीकडे हे पद असणार आहे. पक्षातर्फे चंचला कोद्रे, वैशाली बनकर यांची नावं चर्चेत आहेत. उपमहापौरपद काँग्रेसच्या वाट्याला आलं आहे. या पदासाठी पक्षातर्फे दीपक मानकर, आबा बागुल यांची नावं चर्चेत आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुण्याचा महापौर कोण असेल याचा उलगडा होईल. दरम्यान पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचे सुभाष जगताप हे गटनेते आणि सभागृह नेते असणार आहेत. तर चेतन तुपे उपगटनेते असणार आहेत.