मुकुल कुलकर्णी, www.24taas.com, नाशिक
नाशिकचा गड राखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी केली. इतकं करुनही आघाडीची गाडी फक्त ३५ जागांपर्यंतच पोहोचू शकली. त्यामुळेच आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडत ब्लेमगेमला सुरुवात झाली आहे.
नाशिकवर कब्जा करण्यासाठी छगन भुजबळांचे सगळे प्रयत्न फोल ठरले. नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रवादीनं काँग्रेसला सोबत घेत निवडणुका लढवल्या होत्या. पण नाशिककरांनी भुजबळांचे मनसुबे धुळीला मिळवत आघाडीला फक्त ३५ जागांवर रोखलं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीला तीन जागा जास्त मिळाल्यात तर काँग्रेसला सहा जागांचा फटका बसला. त्यामुळे भुजबळांनी काँग्रेसला दोष द्यायला सुरुवात केली आहे.
भुजबळांबरोबरच काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांनीही काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. विरोधी पक्षनेत्या हेमलता पाटील, ममता पाटील, वंदना मनचंदा, शोभा बच्छाव यांचे पती दिनेश बच्छाव यांच्या पराभवाला शहराध्यक्ष जबाबदार असल्याचा आरोप केशव पाटील यांनी केलाय. शहराध्यक्षांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. एकीकडे पराभवाचं खापर काँग्रेसवर फोडायचं आणि दुसरीकडे मनसेला सत्तेपासून ऱोखण्यासाठी काँग्रेसची साथ सोडायची नाही, अशी दुटप्पी खेळी राष्ट्रवादी खेळतंय. त्यामुळे काँग्रेसची चांगलीच फरफट होतेय. अशा परिस्थितीत काँग्रेस काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.