नाशिकचे महापौर करुन दाखवणार का?

नाशिक महापालिकेवर झेंडा फडकविल्यानंतर मनसेचे 'कारभारी' आता कामाला लागलेत. महापौरांनी पहिला दौरा काढला तो गोदापार्क आणि गंगाघाटाचा...राज ठाकरे यांच्या कल्पनेतला गोदापार्क साकारून दाखवू, अशी घोषणा यतीन वाघ यांनी केली आहे.

Updated: Mar 25, 2012, 05:45 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिक महापालिकेवर झेंडा फडकविल्यानंतर मनसेचे 'कारभारी' आता कामाला लागलेत. महापौरांनी पहिला दौरा काढला तो गोदापार्क आणि गंगाघाटाचा...राज ठाकरे यांच्या कल्पनेतला गोदापार्क साकारून दाखवू, अशी घोषणा यतीन वाघ यांनी केली आहे.

 

नाशिककरांसाठी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय ठरलेल्या गोदापार्कची महापौरांनी आय़ुक्त आणि अधिका-यांच्या मोठ्या लवाजम्यासह पाहणी केली.  राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेने जाणूनबुजून गोदापार्ककडे दुर्लक्ष केल्याचा आरोप महापौरांनी केलाय. गोदापार्कच्या दुरवस्थेला तत्कालीन सत्ताधारी आणि प्रशासकीय यंत्रणा जबाबदार असून यापुढे अधिका-यांचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा दमच महापौरांनी भरलाय. गोदापार्कची लांबी वाढविण्यासाठी भुसंपादन करणार असल्याचं महापौरांनी सांगितलं.

 

गोदावरी प्रदुषणमुक्तीसाठी ठोस उपाययोजना आखून नाल्यांचं पाणी गोदावरीत सोडण्यासाठी मज्जाव केला जाणार आहे. तर सोमेश्वरजवळ जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी ८ एकर जागा संपादित करणार असल्याचंही महापौरांनी सांगितलंय.

 

गोदापात्रातील पानवेलींचीही महापौरांनी पाहणी केली. यापूर्वीही अनेकवेळा पदाधिकारी आणि अधिका-यांचा जथ्था इथं येऊन गेलाय. मात्र, वरवरची मलमपट्टी वगळता काहीही ठोस उपाययोजना झाली नसल्याचं नाशिककर म्हणताहेत.

 

अधिका-यांना धारेवर धरत रामनवमीच्या आत गोदावरीतील गाळ काढण्याचे आदेश महापौरांनी दिलेत खरे. मात्र, महापौरांचा हा हुरूप कायम राहतो, की परत एकदा फक्त चर्चाच होते, याकडे आता नाशिककरांचं लक्ष लागलंय.