नाशिकची प्रतिमा उजळ, करणार खा. भुजबळ

गुन्हेगारीमुळे नाशिकची डागाळत चाललेली प्रतिमा सुधारण्यासाठी आता खासदार समीर भुजबळांनी गुन्हेगारीच्या संदर्भातील तक्रारी नागरिकांनी थेट आपल्याकडे कराव्या यासाठी स्वत:चा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरदेखील जाहीर केला आहे.

Updated: Nov 1, 2011, 12:15 PM IST

झी २४ तास वेब टीम, नाशिक

 

शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयशी ठरत असलेल्या नाशिक पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी खासदार समीर भुजबळांनी अनोखी क्लुप्ती लढवली आहे. चेन स्नॅचिंग, गँगवार, वाहनचोरी असो की गावगुंडांचा त्रास यापैकी कुठल्याही समस्येने नागरिक त्रस्त असतील आणि पोलिस त्याची दखल घेत नसतील, तर त्यांनी ९४२३९८२३२४ हा नंबर फिरवून तुम्ही पोलिसांची तक्रार थेट खासदार समीर भुजबळांकडे करण्याची सोय केली आहे. त्याचबरोबर MP.samirbhujbal@gmail.com या ईमेलवरही तक्रार करण्याची सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसनशील शहरांच्या यादीत नाशिकचा १६वा नंबर लागतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इथल्या गुंडगिरीने कळस गाठला. तत्कालीन पोलीस आयुक्त विष्णुदेव मिश्रांच्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात स्थिरावलेली शहरातली गुंडगिरी सध्याचे पोलीस आयुक्त लोखंडेंच्या कारकीर्दीत नाशिककरांवरच शिरजोर झाली. वाढत्या गुन्हेगारीमुळे नाशिकची विकासात्मक प्रतिमा डागाळत असल्याने जनतेनेही गुंडगिरी संपवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहन खासदार भुजबळ यांनी केलं आहे.

 

गुंडांना वेसण घालण्यास सपशेल अपयशी ठरत असल्याची टीका झाली की नाशिकचे पोलिस आयुक्त विनोद लोखंडे मनुष्यबळ, साधनसुविधांच्या अभावाचं कारण देतात. त्यामुळे भुजबळ फाऊंडेशनच्या माध्यमातून खासदार भुजबळांनी नाशिकमधील १५ पोलिस ठाण्यांना इंटरनेट, प्रिंटर, युपीएससह संगणक उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामुळे मनोधैर्य खच्ची झालेल्या नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीत या संगणकांमुळे तरी सुधारणा होईल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.