कर्बाईडवाल्या आंब्यांवर छापे

नाशिक शहरात कार्बाईडचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने अन्न औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.या छाप्यांमध्ये विविध आंबे आणि रासायनिक पदार्थ सील करण्यात आले आहेत.

Updated: May 4, 2012, 08:46 PM IST

www.24taas, नाशिक

 

नाशिक शहरात कार्बाईडचा वापर करून आंबे पिकवले जात असल्याने अन्न औषध प्रशासनाने विविध ठिकाणी छापे टाकले आहेत.या छाप्यांमध्ये विविध आंबे आणि रासायनिक पदार्थ सील करण्यात आले आहेत.  रासायनिक पदार्थांचा वापर करून पिकवलेले आंबे आरोग्यास अपायकारक असतात त्यामुळे असा वापर थांबावा यासाठी प्रशासनाने एकाच वेळी टाकलेल्या या छाप्यानी मार्केटमध्ये उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. आंबे महाग झाले असल्याने लवकर पिकवून पैसे कमाविण्याचा उपक्रमास या छापासत्रामुळे फटका बसला आहे.

 

नाशिकच्या पेठ रस्त्यावरच्या बाजारपेठेतल्या आंब्याचं गोदामात आंब्यांच्या बाजूला पांढरी पावडर ठेवण्यात आल्याचं आढळून आलं. ही पांढरी पावडर आंबे टिकविण्यसाठी नव्हे तर आंबे पिकविण्यासाठी असते. कार्बाईड या रासायनिक पावडरमुळे आंबे दोन तीन दिवसांऐवजी एक ते ते दीड दिवसात पिकतात. मात्र त्यामुळे आंब्यांमध्ये विषारी प्रक्रिया होते. हे आंबे चवीला गोड लागत असले तरी आरोग्याला ते हानिकारक  असतात.

 

नाशिकमधल्या विविध दुकानांमध्ये असे छापे टाकण्यात आलेत.  यामध्ये दोनशे किलो आंबे ताब्यात घेण्यात आलेत. हे आंबे आता पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील. मात्र बाजारपेठेत असेच आंबे आले असतील का त्याची तपासणी करणं महत्त्वाचं आहे.