www.24taas.com, नागपूर
मनात काही करून दाखवण्याची जिद्द असली तर काहीच अशक्य नाही असं म्हणतात. हेच करून दाखवलं आहे नागपूरातल्या बारावीच्या दोन अपंग विद्यार्थ्यांनी. राहुल बजाज आणि प्रिती बरडे या दोन विद्यार्थ़्यांनी अपंगात्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवलं आहे. राहूल बजाज आणि प्रिती बराडे. नागपुरातले दोघंही अपंग विद्यार्थी. मात्र इतर विद्यार्थ्यांना लाजवेल अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे.
अंध असलेल्या राहुलनं बारावीच्या परीक्षेत तब्बल ९५ टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं. लॅपटॉपच्या मदतीनं राहुलनं १२ वीचा अभ्यास केला. त्याच्या या अतुलनीय यशानं त्याचे कुटुंबियही भारवून गेले. राहुलप्रमाणे नागपूरच्या कापसी परिसरात राहणाऱ्या प्रिती बरडे हिनंही अपंगत्वावर मात करून बारावीच्या परीक्षेत यश मिळवलं आहे. सेरेबल पाल्सी या आजारामुळे प्रिती चालू शकत नाही.
असं असतांना तिनं बारावीचा अभ्यास नेटानं केला आणि यश मिळवलं. तिला पुढे जाऊन संगणक क्षेत्रात नाव कमवायचं. अंधत्व किंवा अपंगत्व आले म्हणजे सगळं संपतं असे नाही हे या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. त्यांची ही जिद्द पाहिल्यानंतर इतर विद्यार्थ्यांनी यातून बोध घ्यायलाच हवा.