'नंतर या साहेब रजेवर गेलेत'

अकोला महापालिकेचा इतिहास म्हणजे चर्चेचा विषय. मग पालिकेचा अनियमित कारभार असो, की अधिकाऱ्यांची सुटी. अकोला महापालिका कायमचं चर्चेत असते. पण याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो ही मात्र गंभीर बाब आहे.

Updated: Apr 29, 2012, 03:50 PM IST

www.24taas.com, अकोला

 

अकोला महापालिकेचा इतिहास म्हणजे चर्चेचा विषय. मग पालिकेचा अनियमित कारभार असो, की अधिकाऱ्यांची सुटी. अकोला महापालिका कायमचं चर्चेत असते. पण याचा फटका सामान्य नागरिकांना बसतो ही मात्र गंभीर बाब आहे. ही परिस्थिती आहे अकोला महापालिकेची. जी महापालिका काही महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती.

 

अकोलेकरांनी नवीन नेत्यांच्या हाती फेब्रुवारीमध्ये कारभार सोपावला. पण आता अकोलेकरांना याचा पश्चाताप होतो आहे. पालिकेतले सगळे विभाग सध्या ओस पडले आहेत. कारण सगळेच जबाबदार अधिकारी कुठल्या ना कुठल्या कारणानं रजेवर गेले आहेत. दुपारनंतर तर पालिकेतले सगळेच विभाग ओस पडतात. या सगळ्याचा फटका बसतो आहे तो सामान्यांना कुठल्या कामसाठी पालिकेत गेलं की, 'नंतर या साहेब रजेवर गेलेत' हे पठडीतलं उत्तर ऐकावं लागतं.

 

हे कमी की काय म्हणून अधिकारी नसल्यानं शहरातल्या स्वच्छतेचेही बारा वाजले आहेत. त्यात पाणी टंचाईनंही डोकं वर काढलं आहे. गो. रा. बैनवाड यांना जरी प्रभारी आयुक्त पद दिलं असलं तरी त्यांचंही पालिकेत दर्शन दुर्लभचं. त्यामुळं त्यांचीही 'चार दिन की सुलतानकी' काय कामाची असा प्रश्न आहेच. दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण तापतं आहे. स्थायी समिती सदस्यपदाची निवडणूक न्यायलयीन फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळं स्थायी समितीचं अस्तित्वचं हरपलं आहे. या सावळ्या गोंधळात मे महिना आला तरी पालिकेचा अर्थसंकल्पही अजून सादर झालेला नाही.

 

अशा परिस्थितीत आंदोलनाचा इशारा न देतील तर ते विरोधक कसले. असा गोंधळ असणारी पालिका अकोलेकरांना काय सोयीसुविधा देणार... पाणीटंचाई कशी घालवणार. असे एक ना अनेक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहेत.