संदेश सावंत, www.24taas.com, रत्नागिरी
माडावर चढणं तुम्हाला कठीण वाटत असेल, पण आता ते सहजपणे शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठानं माडावर चढण्याकरता खास यंत्र विकसीत केलं आहे. या यंत्राच्या प्रसारासाठी त्यांनी माडावर चढण्याची स्पर्धा आयोजित केली होती.
उंचच उंच माडांची बनं म्हणजे कोकणाची आणखी एक ओळख आहे... मात्र कोकणाच्या सौंदर्यात भर घालणा-या या नारळाच्या झाडांवर चढणं म्हणजे एक दिव्यच... एखाद्याला सरसर माडावर चढताना पाहणं कौतुकाचं... मात्र हेच आता सर्वसामान्यांसाठीही शक्य आहे. कारण कोकण कृषी विद्यापीठानं एक यंत्र विकसित केलंय ज्यामुळे माडावर चढणं सहजशक्य झालंय. या यंत्राचा प्रसार करण्यासाठीच विद्यापीठानं एक स्पर्धा आयोजित केली होती. आणि याला भरघोस प्रतिसादही मिळाला. तरुणांना माडावर झपाझप चढताना पाहून वयस्कर मंडळींनीही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात महिलादेखिल मागे नव्हत्या.
स्पर्धकांचा हा उदंड उत्साह पाहून कुलगुरूंनाही राहवलं नाही आणि त्यांनीही यंत्राच्या मदतीनं माडाचा शेंडा गाठलाच. कोकणात माडावर चढण्यासाठी माणसं उपल्बध होत नसल्यानं विद्यापीठानं हे यंत्र विकसित करून त्याचा आता प्रसार केला जातोय. दरम्यान स्पर्धेचा उद्देश काहीही असला तरी माडावर अशाप्रकारे सरसर चढण्याची मजा मात्र काही औरच होती, हे सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाच्या चेह-यावरून दिसून येत होतं.