www.24taas.com, मुरबाड
मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत. परिणामी पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करण्याची वेळ नागरिकांवर आलीय.
खेळण्या बागडण्याच्या वयात डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन जाणा-या या मुली पाहिल्यावर कुणाचीही मान शरमेनं खाली जाईल. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारी यंत्रणेला याची पर्वा नाही. परिणामी आटलेल्या विहिरीतल्या झ-यातून गढूळ पाणी काढण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. दररोज सुमारे चार ते पाच तास पायपीट केल्यानंतरही या महिलांच्या हंड्यात येतं, ते गढूळ पाणी.
मुरबाड तालुक्यात 227 वाड्या आहेत. त्यासाठी सुरू करण्यात आलेल्या 178 पाणी पुरवठा योजना मागील सात वर्षातही पूर्ण झालेल्या नाहीत. अर्थात ठेकेदार मलिदा खाऊन कधीच मोकळे झालेत. 30 पाणी पुरवठा कमिट्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हेही दाखल झालेत. मात्र सुमारे 90 कोटी रूपये भ्रष्टाचारात जिरले असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलीय.
तालुक्यातल्या झाडघर, पारधवाडी, बोरवाडी, तळे खळ, पोचळे सारख्या अनेक वाड्या आणि पाड्यात पाणी पोहचलेलं नाही. परिणामी दोन वेळच्या अन्नासाठीची मारामार असलेल्या आदिवासींवर आता पाण्यासाठीही पायपीट करण्याची वेळ आलीय.