कोकणातला शेतकरी म्हणतोय, 'साथी हाथ बढाना...'

संगमेश्वरमधील संगद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सुमारे ४०० शेतकरी या एकीच्या बळावर जमीन कसताना दिसतात.

Updated: Jul 26, 2012, 10:32 AM IST

www.24taas.com, रत्नागिरी 

स्वत:ची शेती असूनही कोकणातला माणूस मुंबईत लहान-सहान कामं करतो. त्यामुळे गावकडची शेती ओस पडलेली असते. अलीकडच्या काळात तर शेतीची कामं करण्यासाठी माणसंही उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोकणातली शेतीही थंड पडलीय. मात्र, संगमेश्वरमधील संगद येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. सुमारे ४०० शेतकरी या एकीच्या बळावर जमीन कसताना दिसतात.

 

कोकणात रोजंदारी परवडत नाही आणि वेळही खर्च होत असल्यानं शेती करण्याच्या भानगडीत तरुण मंडळी पडत नाहीत . मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वरमधील संगद गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूदायिक शेतीचा प्रयोग यशस्वी  केला आहे. एकाच वेळी सुमारे ३०० ते ४०० शेतकरी शेतात राबून नांगरणी करत आहेत. त्यामुळे सामूदायिक लावणीचं वेगळंच चित्र इथं पाहायला मिळतंय.

 

शेतातल्या चिखलात पारंपारिक गीतांच्या लयीवर शेकडो शेतकरी महिला शेतीची काम करण्यात गुंतालेल्याचे चित्र इथं पहिल्यांदाच अनुभवायला मिळतंय. मुख्य म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा आनंद आणि परतावा असा दुहेरी फायदा मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला तरुण मंडळी नगर हातात घेऊन हाकारे  देत नांगरणी करत आहेत. अनेक बैलजोड्या चिखल तुडवत तासनतास नांगरणी करत आहेत. कोणी पेरणी करतोय, कोणी रोप काढतोय तर कोणी लावणी लावतोय अस अविश्वसनीय दृश्यं प्रत्यक्ष शेतात अवतरलेलं पाहताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरही आनंदाचे भाव आहेत.

 

भाऊबंदकीमुळे विभक्त झालेली कुटुंब पद्धती आणि त्यामुळे झालेली शेतीची वाताहात थांबवण्यासाठी सामूहिक शेतीचा उपक्रम नक्कीच गरजेचा आणि कौतुकास्पद  आहे आणि कोकणातली शेतीलाही समृद्धीच्या वाटेनं वाटचाल करण्यास हातभार लागतोय.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी :

 

[jwplayer mediaid="145838"]

 

.