११ महिन्याच्या मुलीची आजीने केली हत्या

मुलगाच हवा ही मानसिकता कोणत्या थराला नेते त्यातून महिला महिलेची वैरीण कशी ठरते याचं हृदयद्रावक उदाहरण आज नांदेडमध्ये पहायला मिळालं. घरात सलग तिसरी मुलगी झाल्यावरून ११ महिन्याच्या चिमुरडीला तिची आजी आणि आत्यानंच आयुष्यातून उठवलं.

Updated: Jan 9, 2012, 05:41 PM IST

www.24taas.com, नांदेड

 

मुलगाच हवा ही मानसिकता कोणत्या थराला नेते त्यातून महिला महिलेची वैरीण कशी ठरते याचं हृदयद्रावक उदाहरण आज नांदेडमध्ये पहायला मिळालं. घरात सलग तिसरी मुलगी झाल्यावरून ११ महिन्याच्या चिमुरडीला तिची आजी आणि आत्यानंच आयुष्यातून उठवलं. आजीसाठी नात ही दुधावरची साय असते मात्र या घटनेत इंदिरा कदम ही आजीच हैवान झाली.

 

११ महिन्याच्या नातीचा गळा दाबुन तिनं खून केला. या पाशवी कृत्याला तिची मुलगी शकुंतला अडकिणे हीनं निर्लज्जपणे साथ दिली. या दोघींच्या विरोधात बाळाची आई अर्चना आनंद कदम यांनी तक्रर केल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुकली खेळण्यात मग्न असताना इंदिरा कदम आणी आत्या शकुंतला यांनी मान पिरगळून निर्दयीपणे मारलं.

 

याच मानसिकतेतून नांदेड शहरातल्या इतवारा भागात एका स्त्री अर्भकाला टाकून देण्यात आलं होतं. या अर्भकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या दोन्ही घटना पाहता पुरोगामी महाराष्ट्रातही मुलींकडं पाहण्याचा दृष्टीकोनं बदललेला नसल्याचं दुर्दैवी वास्तव समोर आलं आहे.