www.24taas.com, औरंगाबाद
सर्वसामान्यांच्या प्रश्न राज्यपातळीवर मांडण्यासाठी लोक आमदार निवडून देतात. आपले प्रश्न सोडवावे अशी सर्वसामान्यांची भावना असते. मात्र, हेच आमदार जेव्हा दांड्यांवर दांड्या मारतात तेव्हा सामान्यांना काय वाटत असेल याचा विचार हे आमदार करीत नाही. मराठवाड्यातील आमदारांनी विधीमंडळात प्रश्न मांडण्यासाठी नव्हे तर दांडी मारण्यात आघाडी प्रस्थापित केलीय.
मराठवाड्यातील आमदार विधीमंडळात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी दांडी मारण्यातच पटाईत असल्याचं महाराष्ट्र विधानसभेच्या अहवालातच समोर आलंय. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मराठवाड्यातील विधानसभेच्या ५१ आमदारांपैकी ५० टक्के आमदारांनी कामकाजाला दांडी मारली. या दांडीबहाद्दर आमदारांमध्ये पहिला नंबर पटकावलाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी. अशोक चव्हाणांची अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हजेरी केवळ १६.१६ टक्के आहे. अशोकरावांचे समर्थक हनुमंतराव पाटील २४ दिवसांपैकी ५ दिवस हजर होते तर सिल्लोडचे आमदार अब्दूल सत्तार केवळ ८ दिवस...
अशोकरावांनंतर दांडीबहाद्दरात क्रमांक लागतो तो आमदार राजीव सातव यांचा... २४ दिवसांपैकी त्यांनी केवळ सहा दिवस अधिवेशनाला हजेरी लावली आहे. दुसरीकडे मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधवांची विधानसभेतील उपस्थिती तर धक्कादायकच आहे. त्यांनी २४ दिवसांपैकी २३ दिवस दांडी मारली आहे. याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अमित देशमुख, वैजनाथ शिंदे, बसवराज पाटील यांची अधिवेशन काळातील हजेरी ४० टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
‘आमदार आपण कशासाठी निवडून आलोय हे विसरले म्हणूनच दांड्या मारतात’ अशी टीका मराठवाड्यातील इतर आमदारांनी केलीय. मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे. सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. विकासाच्या नावानंही बोंब आहे. मात्र, मराठवाड्यातील या आमदारांना दांड्या मारण्यातच धन्यता वाटतेय.
व्हिडिओ पाहा:
[jwplayer mediaid="146794"]
.
.