शहरात पकडलेल्या बनावट नोटांमागे आंतरराज्यीय टोळी सक्रीय असल्याचा पोलिसांचा संशय आहे. झारखंड आणि पश्चिम बंगालमधील आरोपी बनावट नोटा चलनात आणताना पकडल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.
टोळीचा शोध घेण्यासाठीच पोलिसांनी आरोपीच्या १४ दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी कोर्टाकडे केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. पठाण यांनी आरोपी मुख्तार हुसैन बिथू शेख यास शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
रविवारी झारखंडच्या शेख नजीर या बनावट नोटा चलनात आणणा-या आरोपीस कुंभारवाडा येथील व्यापा-यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले. २४ ऑक्टोबर रोजी मुख्तार हुसैन बिथू शेख (२४ रा. जोधकर जि. मालदा प. बंगाल ) यास टीव्ही सेंटर चौकात पकडण्यात आले. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता पोलिसांच्या वतीने सहायक सरकारी वकील सुहास कुलकर्णी यांनी बाजू मांडली. बनावट नोटा प्रकरणात आंतरराज्यीय टोळी सक्रीय आहे काय यासंबंधीचा शोध घ्यायचा आहे.
आरोपींच्या साथीदारांचा शोध घ्यायचा असून, बनावट नोटा किती ठिकाणी चलनात आणल्या यासंबंधीचीही माहिती घ्यायची आहे. आरोपींसोबत किती लोक यात गुंतलेले आहेत याचाही शोध घ्यायचा असल्याने १४ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली.