सरकार झालं उदार, पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त!

देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध झाल्यानंतर आता युपीए सरकारने पेट्रोलचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Updated: Jun 2, 2012, 08:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध झाल्यानंतर आता युपीए सरकारने पेट्रोलचे दर 2 रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. यापूर्वी पेट्रोलचे दर साडे सात रुपयांनी वाढवून युपीए सरकारने जनतेचा रोष ओढवून घेतला होता. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील.

 

सामान्यांना पुन्हा एकदा पेट्रोल दरवाढीला सामोरे जावे लागले होते.आजवर कधीही झाली नव्हती इतक्या मोठ्याप्रमाणात पेट्रोल मध्ये झालेली ही दरवाढ झाली होती. यापूर्वी पेट्रोलच्या किंमतीमध्ये किरकोळ एक दोन रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, यूपीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी भारताच्या जनतेला भेट देत त्यांचे कंबरडे मोडले होते.

 

युपीए सरकारने तीन वर्षापूर्वी घेतलेल्या शपथेच्या वेळी पेट्रोलच्या किंमती ४० रुपयांच्या आसपास होती. आता जवळपास दुप्पट किंमत झाली असून ही किंमत ७८.१६ झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमती आणि पैशाच्या तुलनेत डॉलरची वाढलेली किंमत यामुळे पेट्रोलची दरवाढ अटळ होती.

महागाईच्या वणव्यात सामान्य जनता आणखी भरडली जात असताना ममता बॅनर्जींनीही पेट्रोल दरवाढीवर आपली नाराजी व्यक्त केली होती. एनडीएने ३१ मे रोजी ‘भारत बंद’ केला होता. सरते शेवटी केंद्र सरकारने पेट्रोल २ रुपयांनी स्वस्त करत काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला आहे.