सरकारने देशाची फसवणूक केली- अण्णा हजारे

मुंबई लोकपाल आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडत अण्णा हजारेंनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं. या पत्रात अण्णा यांनी सरकारने संसदेत कमकुत लोकपाल विधेयक सादर करुन लोकांची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे

Updated: Jan 22, 2012, 10:58 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
मुंबई लोकपाल आंदोलनाचा फज्जा उडाल्यानंतर पहिल्यांदाच मौन सोडत अण्णा हजारेंनी रविवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं. या पत्रात अण्णा यांनी सरकारने संसदेत कमकुत लोकपाल विधेयक सादर करुन लोकांची फसवणूक केल्याचं म्हटलं आहे. अण्णांनी विधेयकात नागरिकांची सनद तसंच कनिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांना लोकपालच्या कक्षेत समाविष्य न करण्याविषयी सवाल केला आहे.

 

सरकारने सादर केलेले लोकपाल विधेयक खरोखरचं सक्षम विधेयक आहे का आणि तुम्ही देशाची फसवणूक कशी काय करु शकता असा प्रश्न अण्णांनी या पत्रातून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विचारला आहे. संसदेतील सरकारचे लोकपाल विधेयक ही धूळफेक होती आणि सरकारच असं करु लागलं तरी संसदेचे आणि लोकपालचं भवितव्य अंधारमय होईल असं अण्णांनी या पत्रात नमुद केलं आहे.

 

अण्णा हजारे यांनी काँग्रेसचे महासचिव राहुल गांधी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनाही पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भारत अमेरिका नागरी अणु कराराच्या वेळेस जे धैर्य दाखवलं होतं तसंच यावेळेसही दाखवावे असं आवाहन अण्णा हजारे यांनी पत्रातून केलं.

 

पंतप्रधानांना उद्देशून अण्णांनी लिहिलं आहे की तुमचे वय आता ८० वर्षांचे आहे. या देशाने तुम्हाला सर्व काही दिलं आहे. आता भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्यासाठी सक्षम लोकपालची मागणी देश करत आहे. तुम्ही नागरी अणु करार संसदेत संमत करुन घेताना दाखवलेले धैर्य परत एकदा लोकपालच्या संदर्भात दाखवा आणि देश तुम्हाला कायम स्मरणात ठेवेल असं अण्णांनी पंतप्रधानांना पत्रातून लिहिलं आहे.

 

अण्णा हजारेंची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी प्रथमच पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांशी संवाद साधला आहे.