www.24taas.com, नवी दिल्ली
व्यंग्यचित्रांबाबत संसदेत सर्वच खासदारांनी आवाज उठविल्याने आता जी काही शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात व्यंग्यचित्र असतील ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यंग्यचित्राच्या निमित्ताने पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या व्यंग्यचित्रांच्या समावेशावरून सोमवारी संसदेत पुन्हा एकदा जोरदार गदारोळ झाला. त्यानंतर खासदारांनी तीव्र विरोध केला होता.
'एनसीईआरटी'च्या पाठ्यपुस्तकांमधील राजकीय व्यंग्यचित्रे ही राजकारण्यांना खलनायक ठरवित आहेत. त्यामुळे संस्कारक्षम वयामध्ये मुलांची मने कलुषित करण्याचे षड्यंत्र आहे, असा आरोप खासदारांनी केला. त्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी नववी ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांचा फेरआढावा घेण्याची घोषणा केली. यासंदर्भात 'यूजीसी'चे माजी प्रमुख डॉ. सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.
'एनसीईआरटी'च्या पाठ्यपुस्तकात असलेल्या डॉ. आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरूंवरील व्यंग्यचित्रांवरून चांगलाच गोंधळ झाला. सोमवारी लोकसभेमध्ये व्यंग्यचित्रांचा मुद्दा उपस्थित झाला. कामकाज सुरू होताच अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर यांनी या विषयावर सरकारने खुलासा करण्याची मागणी केली. यावर सर्व राजकीय पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला.
प्रणव मुखर्जी यांनी संतप्त सदस्यांना शांत केले; पण शून्य काळामध्ये पुन्हा एकदा हा विषय चर्चेला येऊन त्यानिमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी 'एनसीईआरटी'च्या अभ्यासक्रमाचे आणि मनुष्यबळ विकासमंत्रालयाच्या कारभारावर टीका केली. विरोधी पक्षांप्रमाणेच काँग्रेसच्याही सदस्यांनी यानिमित्ताने सिब्बल यांना लक्ष्य केले. त्यानंतर सिब्बल यांनी खुलासा केला. 'एनसीईआरटी'च्या नववी ते बारावीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या मजकुराचा समावेशाची शिफारस करणाऱ्या सर्व तज्ज्ञांची चौकशी केली जाईल आणि जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.