झी २४ तास वेब टीम, मुंबई
महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, असा भावनिक सवाल उ. प्रदेशातल्या मतदारांना करत राहुल गांधींनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. राहुल यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद मग मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राहुल गांधींचं हे वक्तव्य म्हणजे प्रांतवाद नव्हे काय, असा सवाल करत शिवसेनेनंही टीकेची संधी सोडली नाही.
मायावती सरकारवर हल्लाबोल करत काँग्रेसचे सरचिटणीस आणि युवा नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातल्या जनतेला विकासाच्या मुद्द्यावर हा असा सवाल विचारला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आणि नेहरुंच्या उ. प्रदेशातल्या फूलपूर मतदारसंघातून काँग्रेसनं उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुकंलं. राहुल यांच्या वक्तव्याचे पडसाद थेट महाराष्ट्रातही उमटले.
काँग्रेसचेच खासदार संजय निरुपम यांच्या उत्तर भारतीय मुंबई बंद करु शकतात, या वक्तव्यानं सुरु झालेला राज्यातला वाद संपतो ना संपतो, तोच खुद्द काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या वक्तव्यानं पुन्हा एक नवा वाद निर्माण झाला. निवडणूक कुठलीही असो आणि पक्ष कुठलाही असो. प्रांतवादासारख्या मुद्द्यांना हात घालून राजकारणाची पोळी भाजण्याची खेळी मात्र सगळीकडे सारखीच असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.