ब्लड़ इन्फेक्शन, विलासरावांच्या प्रकृतीला धोका

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Updated: Aug 8, 2012, 11:18 PM IST

www.24taas.com, चेन्नई/ मुंबई

 

केंद्रीय मंत्री विलासराव देशमुखांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. त्यांच्या शरिरात मोठ्या प्रमाणात ब्ल़ड इन्फेक्शन झाल्यानं शरीरातल्या अनेक अवयवांना इजा पोहचली आहे. त्यामुळं डॉक्टरांनी तूर्तास यकृत प्रत्यारोपणाचा निर्णय पुढं ढकलला आहे. विलासरावांची प्रकृती स्थिर व्हावी यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

शरिरातलं ब्लड़ इन्फेक्शन थांबल्याशिवाय कोणताही निर्णय तूर्तास घेण्यात येणार नसल्याचंही हॉस्पिटलकडून सांगण्यात आलंय. विलासरावांच्या यकृतात मोठा बिघाड झाल्यानं यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.मात्र ब्लड इन्फेक्शनमुळं मोठा अडथळा निर्माण झालाय. प्रख्यात यकृत प्रत्यारोपणतज्ज्ञ डॉक्टर मोहम्मद रेला यांच्या निरीक्षणाखाली ते आहेत. विलासरावांना सध्या व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलंय.

 

पुढील दोन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारली तर त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काल विलासरावांची भेट घेण्यासाठी चैन्नईला जाणार होते, मात्र हॉस्पिटलमध्ये भेटीची तूर्तास परवानगी नसल्याने त्यांनी चेन्नईला जाण्याचा कार्यक्रम रद्द केला.. विलासरावांच्या प्रकृतीबाबत मुख्यमंत्र्यांनी फोनवरुन अमित देशमुख यांच्याकडून माहिती घेतली.

 

 राज्यभरात प्रार्थना 

 

विलासराव देशमुखांसाठी राज्यभरात प्रार्थना सुरू  आहे. त्यांना बरं वाटावं यासाठी लातुरमध्ये पुजा-अर्चा करण्यात येतीय. विलासराव देशमुख यांच्या एकमत वृत्तपत्राच्या १५० कर्मचा-यांनीही त्यांच्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी गणपतीबाप्पाकडे प्रार्थना केली.

 

चेन्नईच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या विलासराव देशमुखांसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पूजा-अर्चा सुरू केलीय. सर्वच लातूरकर विलासरावांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करत आहेत.

 

लातूरात पक्षभेद विसरुन विलासराव देशमुख लवकर बरे व्हावे यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रुद्र हनुमान मंदिरात आरती केली. तर नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी विलासरावांची प्रकृती सुधारण्यासाठी टेकडी गणपतीला साकडं घातलंय. अनेक कार्यकर्त्यांनी मंदिरात एकत्र येऊन गणपतीसमोर प्रार्थना केली.