www.24taas.com, मुंबई
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांडातील ५ आरोपींची निर्दोष मुक्तता झालीये. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. मात्र इतर चार आरोपींची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे.
सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या नऊ आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधिश व्हि. एम. कानडे आणि पी. डी. कोडे यांच्या खंडपीठानं निर्णय दिला. राजूभाई बारीया, पंकज गोसावी, जगदीश राजपूत, सुरेश, अलीज लालू देवजीभाई वसावा आणि शैलेश तडवी यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या ५ जणांविरुद्ध पुरावा नसल्याचं कोर्टानं म्हटलंय.
गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीत जमावानं १ मार्च २००२ मध्ये वडोदरा शहरातील हनुमान टेकडी भागातील बेस्ट बेकरी जाळली होती. त्यात १४ लोकांचा मृत्यू झाला होता. काहि हिंदू कामगार या बेकरीत काम करीत होते. त्यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला होता. या घटनेतील महत्वाची साक्षिदार यास्मीन शेख हिनं आपण सामाजीक कार्यकर्ते तीस्ता सेटलवाड यांच्या दबावाखाली जबाब दिल्याचं सांगितल्यानं खटल्याला नाट्यमय वळण मिळालं होतं.