जगभरात राजस्थान ऐतिहासिक राजवाडे, किल्ले आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखलं जातं. राजस्थाच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारीत आहे. राजस्थानमध्ये चार वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ऑलिव्हची लागवड करण्यात आली होती. या प्रायोगिक तत्वावरील प्रयोगाला यश मिळाल्याने राजस्थानमधले शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या राजस्थानातील गरीब शेतकऱ्यांना ऑलिव्ह हे नगदी पीकाच्या लागवडीमुळे आपल्याला चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतोय.
राजस्थान ऑलिव्ह कल्टिवेशन कंपनी लिमिटेडचे सुरिंदर सिंग शेखावत म्हणाले की नागौर, श्री गंगानगर, हनुमानगड आणि बिकानेर जिल्ह्यात ६५० हेक्टर्स जमिनीवर दोन लाख रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावरील लागवड यशस्वी झाली होती. यंदाच्या वर्षात जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात लागवडीला सुरवात होईल आणि येत्या तीन वर्षात क्षेत्रफळ ५००० हेक्टर्सपर्यंत वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ऑलिव्हची लागवडीमुळे केवळ शेतकऱ्यांनाच लाभ होईल असं नाही तर देशात आरोग्याच्या दृष्टीने लो फॅट खाद्य तेलाची वाढती मागणीही पूर्ण करता येणार आहे.
ऑलिव्हच्या लागवडीसाठी प्रति हेक्टरी १ लाख १३ हजार रुपये खर्च येतो त्यात ५५० रोपांच्या लागवडीला ६३,२५० रुपये आणि ठिबक सिंचन तसंच खतांसाठी २५,००० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पण शेतकऱ्यांना त्यापैकी निम्माच खर्च करावा लागेल कारण रोपांसाठी ७५ टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. एका हेक्टरमध्ये १५ टन ऑलिव्हची फळे आणि त्यापासून २.५ टन तेल निघू शकतं ज्यातून प्रति हेक्टरी ३.५ लाख रुपयांचा नफा शेतकऱ्याला मिळू शकेल. राजस्थान ऑलिव्ह ही कंपनी प्रति शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि देखरेखीसाटी ५० हेक्टर क्षेत्रासाठी कषीतज्ञांची नेमणुक करणार आहे. तसंच कंपनी चोवीस तास हेल्पलाईनही सुरु करणार आहे. सध्या एक्सट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलची किंमत ६५० रुपये प्रति लिटर तर स्वंयपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या शुध्द ऑलिव्ह ऑईलची किंमत ५७५ रुपये पति लिटर इतकी आहे. देशात वर्षाला ४२०० टन ऑलिव्ह तेल आयात करण्यात येतं.
आता जाता जाता हे प्रत्यक्षात घडावं हीच प्रार्थना नाहीतर याआधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इमूने दिवसा तारे दाखवले होते. तसंच राजस्थानातील शेतकऱ्यांचे तेल कंपनीने काढू नये म्हणजे मिळवलं.