झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढल्याने वाढणार् या महागाईत अधिक भर पडली. मात्र, आता पेट्रोलचे दर दोन रुपयांनी कमी होण्याची शक्तता आहे. त्यामुळे महागाईनं होरपळलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे.
वर्षभरात पाच वेळा पेट्रोलची दरवाढ केल्यानंतर ग्राहकांना थोडासा दिलासा देण्याचे संकेत भारतीय तेल कंपन्यांनी दिले आहेत. १७ नोव्हेंबर म्हणजे येत्या गुरूवारपासून पेट्रोलचे दर दोन रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सरकारनं जून २०१० मध्ये तेल कंपन्यांवरील नियंत्रण हटवल्यानंतर पहिल्यांदाच पेट्रोलचे दर कमी होणार आहेत. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरल्यामुळं पेट्रोलचे दर कमी होणार असल्याचं समजतय.
मात्र तीन नोव्हेंबरला १ रुपये ८० पैशांनी केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीविरोधात युपीए सरकारमधील घटक पक्षांनी काँग्रेसविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसनं हा तेल कंपन्यांच्या अखत्यारितला प्रश्न असल्याचं सांगत याबाबत हात झटकले होते. मात्र घटक पक्षांचा वाढता दबाव आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केलेली दरवाढ मागे घेण्याचीच ही खेळी असल्याचं दिसतंय.