www.24taas.com, नवी दिल्ली
नवी दिल्लीची सत्ता पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यात भाजपला यश येण्याची शक्यता आहे. भाजपने महानगरपालिकेमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीच्या सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना मोठा धक्का आहे. भाजपने काँग्रेसला जोरदार टक्कर दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांपैकी भाजपने १६ जागांवर विजय मिळविला आहे. तर काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. भाजप एकूण १३१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ६६ ठिकाणी पुढे आहे. बसपसह अपक्ष आणि इतर ५४ ठिकाणी आघाडीवर आहेत. उत्तर दिल्लीत भाजप ६० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस २४ ठिकाणी पुढे आहे. दक्षिण दिल्लीत भाजपकडे ४७ जागांवर आघाडी आहे, काँग्रेसला २२ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर पूर्व दिल्लीत भाजप २८ ठिकाणी पुढे आहे. काँग्रेस१६ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्लीतील तीन महानगरपालिकांच्या मतमोजणीस आज सकाळी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरवात झाली. महापालिकेची सत्ता भाजपकडे आहे. दोन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला आहे. दिल्लीकरांनी यंदा गेल्या १५ वर्षांमध्ये सर्वाधिक मतदान केले. यावेळी ५५ टक्के मतदान झाले आहे. दिल्लीच्या २७२ वॉर्डातील २४२३उमेदवारांपैकी कोणाला कौल मिळाला हे आज कळणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये खरी चुरस आहे. दोन्ही पक्षांनी बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.