www.24taas.com, देहरादून
सुप्रीम कोर्टानं आदेश दिल्यानंतर काँग्रेसचे वयोवृद्ध नेते नारायण दत्त तिवारी यांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले आहेत. ३२ वर्षांच्या रोहीत शेखरनं एन डी तिवारी हे आपले पिता असल्याचा दावा दाखल केलाय. तिवारी यांनी आपल्या रक्ताचे नमुने डीएनए टेस्टसाठी दिल्यानंतर शेखरचा हा दावा खरा आहे की खोटा हे लवकरच सिद्ध होणार आहे.
अविभाजित उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन डी तिवारी यांनी आज जिल्हा न्यायाधीश राज कृष्ण, शासकीय इस्पितळाचे मुख्य वैद्यकिय अधीक्षक बी. सी. पाठक, रोहीत शेखर आणि रोहीतची आई उज्ज्वला शर्मा यांच्या उपस्थितीत रक्ताचे नमूने तपासणीसाठी दिले आहेत. एन. डी. तिवारी यांनी याअगोदर डीएनए टेस्टसाठी रक्ताचे नमुने देण्यास हरकत घेतली होती. आपलं वय जास्त झाल्यामुळे आपण रक्त देऊ शकत नाही, अशी सबब त्यांनी पुढे केली होती. मात्र, न्यायालयानं यावरून त्यांना चांगलंच फटकारलं होतं. अखेर, मंगळवारी सकाळी एन डी तिवारी रक्ताचे नमुने देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले.