प्राथमिक शाळांमधूनही मातृभाषेतून शिक्षण देण्याचे आदेश
24taas.com, गांधीनगर
गुजराती जनतेसाठी हिंदी ही भाषा विदेशी असल्याचे स्पष्ट करत राज्य सरकारकडून चालवण्यात येत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये गुजराती भाषेतूनच शिक्षण देण्यात यावे, असे आदेश गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी वाद सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गुजरातमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हा दोन लेनचा असून त्याचे रुंदीकरण करून हा महामार्ग सहा लेनचा करण्याचे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाने ठरवले आहे. त्याबाबत शेतकर्यांना हिंदीतून नोटीस देण्यात आल्या आहेत. त्या नोटीसला जुनागडमधील शेतकर्यांनी गुजरात उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर सुनावणी झाली तेव्हा खंडपीठाने ‘गुजराती’ भाषेच्या बाजूने कौल दिला.
या न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आंदोलन करणाऱ्या पक्षांना आता चांगलाच मुद्दा मिळाला आहे.
भारतात सर्वाधिक बोलली जाणारी हिंदी ही भाषा गुजराती जनतेसाठी परदेशी आहे. शेतकर्यांना नोटीस गुजरातीतून देण्यात न आल्याने त्या रस्त्याच्या रुंदीकरणात अडचणी निर्माण होऊ शकतात. न्यायालयाकडून हा प्रकल्प रद्दही केला जाऊ शकतो, अशा शब्दांत न्यायालयाने गुजरातमध्ये गुजरातीलाच प्राधान्य मिळण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला फैलावर घेतले.
गुजरातमध्ये गुजरातीच!
भाषावार प्रांतरचना झालेली असली तरी स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा वाद अनेक राज्यांमध्ये उफाळून येतो. मातृभाषेची सक्ती केल्यास त्यावरून काहूर उठवले जाते. गुजरातमध्ये मात्र न्यायालयानेच मातृभाषेचा सन्मान ठेवण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला आहे.